

विवेक दाभोळे
बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटात कमालीची चुरशीची लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत रयत क्रांतीच्या मोहिनी सागर खोत यांनी बाजी मारली खरी, पण चर्चा मात्र स्थानिक उमेदवार ऊर्िर्मला संतोष घनवट यांच्या निसटत्या पराभवाचीच होत आहे. अर्थात ही जागा गमावल्याने आमदार जयंत पाटील यांना काहीसा धक्का सहन करण्याची वेळ आली आहे. अर्थात मतदारसंघात जयंतराव यांनी प्रचारादरम्यान म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघात ‘पाऊस’ आणि ‘पुरा’चीच चर्चा मात्र रंगली.
बागणी जि. प. गट सर्वसाधारण महिला प्रवर्ग राहिला, तर या गटातील बागणी आणि कारंदवाडी हे पंचायत समितीचे दोन्ही मतदारसंघ खुले होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी बागणी मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले होते. विरोधातील असलेले बिनीचे शिलेदार तथा युवा उपसरपंच संतोष घनवट यांना जयंत पाटील यांनी आपल्या गोटात घेऊन एकच खळबळ उडवून दिली, तर लगेचच घनवट यांच्या पत्नी ऊर्मिला संतोष घनवट यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देखील जाहीर करून टाकली. जयंतरावांच्या या बिग ब्रेकिंग खेळीने स्थानिक राजकारणात एकच खळबळ माजली. विरोधात महायुती रयत विकास आघाडीकडून आ. सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत यांची उमेदवारी निश्चित होती. सागर खोत यांनी विविध माध्यमातून प्रचार देखील सुरू केला होता.
स्थानिकत्वाचा मुद्दा...
आतापर्यंत जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्वासाठी बागणीला या आधी 1978 मध्ये शिवाजीराव बामणे आणि नंतर 1992 मध्ये कृ. भा. पवार यांच्या माध्यमातून अशी दोनच वेळा संधी मिळाली होती. त्यानंतर मतदारसंघात बागणी हे एक गाव मोठे असून देखील गावाला संधी मिळालेली नाही. परिणामी यावेळी प्रथमच जि. प.साठी उमेदवार स्थानिक हवा की मतदारसंघाबाहेरचा, याची जोरदार चर्चा झाली. याच मुद्द्यावर प्रचाराचे वादळ उठले. गेल्या अनेक वर्षात बागणी गाव हे मतदारसंघातील मोठे गाव असून देखील या गावाला संधी मिळत नसल्याचा मुद्दा प्रचारात ऐरणीवर आलेला होता. यातूनच प्रचाराची हवा चांगलीच तापली देखील. मात्र घनवट यांची गावातच काहींनी ‘गेम’ केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
आक्रमक प्रचार...
प्रत्यक्ष प्रचारादरम्यान देखील, दोन्ही बाजूंकडून कमालीच्या आक्रमकतेवर भर देण्यात आला. खुद्द जयंत पाटील यांनी बागणी गावातच दोन जाहीर सभा घेतल्या, कोपरा सभा घेतल्या. कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी केली. जयंत पाटील यांनी तर भाषणात, मतदारसंघात ‘पाऊस’ खूप पडेल, ‘पूर’ देखील येईल, पण काळजी करू नका, या शब्दात समर्थकांना आश्वस्त केले होते. पाऊस आणि पुराची देखील चर्चा चांगलीच रंगली, तर खोत यांनी देखील प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविली होती. संतोष घनवट यांनी तर याआधी विरोधी आघाडीकडून काम केले असल्यामुळे त्यांना राजकारणातील उलटसुलट प्रवाहांची जाण होती. युवकांचे मोठे संघटन ही संतोष घनवट यांची मोठी जमेची बाजू ठरली. शिवाय जोडीला अनेक दिग्गज नेत्यांची ताकद होती. मात्र प्रत्यक्ष मतांचे आकडे पाहिले, तर अनेक ठिकाणी घनवट यांची पध्दतशीर ‘गेम’ करण्यात आल्याचे स्पष्ट होते. अनेक बूथवर घनवट यांची झालेली पीछेहाट आणि खोत यांना मिळालेले मताधिक्य पाहता, तिरक्या चालीच्या राजकारणाचा ऊर्मिला घनवट यांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले. खुद्द बागणी गावातच खोत यांना मिळालेली जादा मते पाहता, अगदी गावातच घनवट यांची ‘गेम’ झाल्याचे दिसते. मतदारसंघातील बहुतांशी गावात घनवट यांनी चांगली मते घेतली, मात्र काही गावात त्यांना धक्कादायकरीत्या कमी मते मिळाली. पण ‘होमपीच’वरच त्यांना पीछेहाट सहन करावी लागली आणि हाच निकालासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
मोहिनी खोत यांना 10 हजार 408 मते मिळाली, तर ऊर्मिला घनवट यांना 10 हजार 260 मते मिळाली. वंंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुषमा शिखरे यांना 74 मते मिळाली, नोटासाठी (वरीलपैकी एकही नाही) 62 इतके मतदान झाले, तर दोन मते अवैध ठरली.
पंचायत समितीसाठी मात्र ‘जयंत जय हो’..!
दरम्यान, बागणी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदयसिंह प्रतापराव पाटील हे विजयी झाले. त्यांना 5 हजार 674 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील रयत क्रांती पक्षाचे निवास पाटील यांना 5 हजार 6 मते मिळाली.याच गटातील कारंदवाडी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी प्रशांत प्रतापराव पाटील यांना 5 हजार 332 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील रयत क्रांतीचे अनिल सरदेशमुख यांना 4 हजार 552 मते पडली. येथे नोटासाठी 144 मतदान झाले.
खरे तर वारणाकाठचा बागणी जि. प. गट हा जयंत पाटील यांच्यासाठी बालेकिल्ला मानला जातो. जयंत पाटील समर्थकांची मोठी ताकद या साऱ्या भागात आहे. राजारामबापू पाटील उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांचे भक्कम नेटवर्क हाताशी आहे. तरी देखील जयंत पाटील यांनी लक्ष घातलेल्या उमेदवाराची हार होणे हे या पक्षासाठी चांगलेच धक्कादायी ठरले. अर्थात यातून काहींनी स्थानिक राजकारणातील शह - काटशहचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी देखील प्रचार सभात भाषणे करून हवा तापवली होती, तर दुसरीकडे आमदार खोत यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून या भागात कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. याचा त्यांना लाभ झाला.
स्थानिकत्वाच्या मुद्याला बागणीकरांनी डावलले
उमेदवार मतदारसंघातील की मतदारसंघाबाहेरील, हा वाद चांगलाच उफाळून आला होता. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर मात्र पुढे आलेल्या आकडेवारीवरुन बागणी गावाने देखील या मुद्याला बगल दिली असल्याचे स्पष्ट दिसते. संतोष घनवट हे प्रथम 1997 मध्ये उपसरपंच झाले. 2017 मध्ये थेट सरपंच म्हणून विजयी झाले होते. पंचायत समिती सदस्य झाले. तेव्हापासून ते आजअखेर अपराजित राहिले आहेत. त्यामुळेच ऊर्मिला संतोष घनवट यांचा निसटत्या मतांनी झालेला पराभव हा घनवट समर्थकांना जिव्हारी लागलेला आहे.