Sangli municipal action: आठ खोकी पुन्हा उभारली, पुन्हा पडला हातोडा

आयुक्त महापात्र स्वतः उतरल्या रस्त्यावर; पुन्हा खोकी उभारल्यास फौजदारी
Sangli municipal action: आठ खोकी पुन्हा उभारली, पुन्हा पडला हातोडा
Published on
Updated on

सांगली : येथील विश्रामबाग चौकाजवळ पुन्हा उभारलेली 8 खोकी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हटवली. आयुक्त संजीता महापात्र यांनी स्वत: रस्त्यावर उतरून या कारवाईचे नेतृत्व केले. यापुढे याठिकाणी पुन्हा खोकी उभारल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिकेने फेब्रुवारीमध्ये विश्रामबाग चौक ते आलदर चौक यादरम्यानच्या जागेतील विनापरवाना 69 खोकी आणि पत्र्याची शेड हटवून मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतरही काही व्यावसायिकांनी त्याचठिकाणी पुन्हा खोकी उभारल्याने महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत ही कारवाई केली.

दरम्यान, सात ते आठ खोकी पुन्हा उभारण्यात आल्याची तक्रार एका खासगी जागा मालकाने महापालिकेकडे केली होती. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांना तीन वेळा नोटीस देऊन खोकी काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी आयुक्त संजीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक हणमंत मारनूर, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, मालमत्ता विभागाचे रवींद्र चौगुले तसेच महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेने वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवल्यास यापुढेही अशाच कडक कारवाया केल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कारवाईदरम्यान रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आले होते. त्यांच्या मालकीच्या जागेत कंपाऊंड घातले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news