

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून (सिव्हिल) बाळाच्या अपहरण घटनेस सुरक्षारक्षकांसोबत सहा परिचारिकांना जबाबदार ठरवण्यात आले. यामुळे संबंधित सहा परिचारिकांना कारवाईबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले.
मिरज शासकीय रुग्णालयातून बाळाच्या अपहरणाप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने डॉ. प्रियांका राठी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या अहवालात बाळाचे अपहरण होण्यास प्रसूती वॉर्डातील सुरक्षारक्षक व एका वरिष्ठ परिचारिकेसह इतर पाच परिचारिकांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र अहवालात परिचारिका दोषी असल्याचे सिव्हिल प्रशासनाने लपवून ठेवले होते.
पालकमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यानंतर मात्र अहवालात दोषी ठरविलेल्या या सहा परिचारिकांना एका आठवड्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या प्रसूती विभागात 60 रुग्ण असल्याने तेथे गर्दी होती. मात्र परिचारिकांनी कर्तव्य जबाबदारीने निभावले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांसोबत आता सहा परिचारिकांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.