

ऐतवडे बुद्रुक : दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला आहे. पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक असते. ते पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. शिवाय जमिनीचे आरोग्य पोषक ठेवण्यासाठी शेतकर्यांनी दर तीन ते चार वर्षांनंतर एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे.
माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटकद्रव्यांची कमतरता आहे याबाबत माहिती मिळते. जमिनीचे आरोग्य जाणून घेता येते. त्यानुसार आपणाला उत्पादन घेणे सोयीचे होते.सध्या रब्बी आणि खरीप हंगामात सर्व शेतकरी रासायनिक खतांचा, औषधांचा बेसुमार मारा करताना दिसत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर खराब होत चालला आहे. एकीकडे मातीत रासायनिक खतांनी शेतजमीन व्यापली असताना, भाजीपाला उत्पादनानंतर ते लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम करत आहेत. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे किडीसह रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी रासायनिक खतांचा अवाजवी वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके आदींचा मोठ्या प्रमाणावर, तर सेंद्रिय खते, शेणखते, हिरवळीची खते आदींचा वापर कमी प्रमाणात करतात. त्यामुळे शेती नापीक बनत आहे. जमिनीचा पोत खालावत असल्याने पिकेसुद्धा जोमाने वाढत नसल्याचा शेतकर्यांचा अनुभव आहे.