Sangli Crime News
भीमराव माने यांच्या घरावर हल्लाFile Photo

भीमराव माने यांच्या घरावर हल्ला

कवठेपिरान येथे यात्रेतील वादातून तणाव ः वाहनांची तोडफोड; तेराजणांवर गुन्हे दाखल
Published on

सांगली ः कवठेपिरान (ता. मिरज) येथील यात्रेत ऑर्केस्ट्रा बंद केल्याच्या संशयावरून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांच्या घरात घुसून जमावाने हल्ला केला. यावेळी दोन मोटारीवर दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांना हुसकावून लावले. या घटनेनंतर गावात तणाव आहे. याप्रकरणी तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शुभम कृष्णात पाटील (वय 27), मनोहर पिराजी यादव(47), जालिंदर विठ्ठल दिंडे (44), जयराज राजाराम साळुंखे (29), रणजित रंगराव पाटील (30), प्रकाश बाबुराव दिंडे (34), किरण किसन पाटील (31), कपिल शिवाजी किर्ते (38), रोहित नारायण पाटील (35), पवनकुमार राजेंद्र साळुंखे (22), ईस्माईल शब्बीर सय्यद (28), लियाकत शौकत पिंजारी (41) व अरुण भीमराव साळुंखे (46, सर्व रा. कवठेपिरान, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कवठेपिरान येथे सप्तर्षी (सात सय्यद) यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात एका गटाने ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. पोलिसांनी रात्री दहापर्यंत कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पण रात्री दहानंतरही ऑर्केस्ट्रा सुरू होता. याबाबत काही गावकर्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले व पथकाने धाव घेत ऑर्केस्ट्रा बंद केला. पोलिसांनी शासन आदेशानुसार रात्री दहानंतर कार्यक्रम सुरू ठेवता येणार नसल्याचे समजावून सांगितले. ऑर्केस्ट्राबाबत तक्रार केल्याच्या संशयावरून शुभम पाटील व 15 ते 20 जणांचा जमाव भीमराव माने यांच्या घरावर चाल करून गेला. ऑर्केस्ट्रा बंद करण्यास मानेच जबाबदार असल्याच्या समजातून ‘त्यांना सोडायचे नाही’, असे म्हणत जमाव त्यांच्या घरात घुसला. काहींनी घराच्या दरवाजाला लाथा मारल्या. एकाने त्यांच्या मोटारींवर (एमएच 10, सीएन 7333 व एमएच 10 ईई 567) दगडफेक केली. यात वाहनांचे नुकसान झाले. रात्री पावणे बाराच्या सुमारास हा धुडगूस सुरू होता. पोलिस निरीक्षक चौगले व पथकाने धाव घेत जमावास पांगवण्यास सुरुवात केली. जमाव आक्रमक होताच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. या घटनेमुळे रात्री गावात तणावाचे वातावरण होते. ग्रामीण पोलिसांनी तातडीने

हालचाली करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रात्री पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सकाळी हे फुटेज तपासून संशयितांवर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी सहायक निरीक्षक लक्ष्मण जाधव यांनी शुभम पाटील याच्यासह 13 जणांविरोधात फिर्याद दिली आहे. सर्व संशयितांना पोलिस ठाण्यात आणून कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी सकाळी दुसर्‍या गटानेही वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अद्याप नोंद झालेली नाही. संबंधिताची तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे निरीक्षक चौगुले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news