Atpadi unseasonal rain
Atpadi unseasonal rainPudhari

Atpadi unseasonal rain: आटपाडी पश्चिम भागाला अवकाळीचा तडाखा

फळबागांचे मोठे नुकसान; भिंगेवाडीत वीज पडून शेळी दगावली, शेतकरी बचावला
Published on

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागाला दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा जोरदार फटका बसला असून, झरेसह परिसरातील शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

तालुक्यातील झरे आणि आसपासच्या भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू आणि हरभरा ही काढणीला आलेली पिके भिजली आहेत. काही ठिकाणी मळणीची कामे सुरू असतानाच पावसाने धडक दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. डाळिंब व द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. काही भागात झाडे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय चाऱ्याचेही नुकसान झाल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, भिंगेवाडी येथे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हणमंत महादेव माने यांच्या शेळीच्या कळपावर वीज पडली. या घटनेत एक शेळी जागीच ठार झाली, तर तीन शेळ्या जखमी झाल्या. हणमंत माने हे थोडक्यात बचावले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृषी व महसूल विभागाने बाधित क्षेत्रांचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी झरे, भिंगेवाडीसह बाधित परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news