

आटपाडी : शहरातील लिंगे वस्ती आणि नांगरे मळा परिसरात रविवारी (दि.२४) निसर्गाने अक्षरशः कहर केला. दुपारी साडेचारच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नांगरे मळा परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या तासाभराच्या पावसात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हाता-तोंडाशी आलेली डाळिंब व आंबा पिके जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका नांगरे मळ्यातील डाळिंब बागांना बसला. झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली, तर अनेक ठिकाणी फांद्या मोडून बागांचे मोठे नुकसान झाले. विनोद सुरेश यादव, रामचंद्र शंकर नांगरे, महेश गुलाब नांगरे, रामचंद्र विलास नांगरे, पियुष गुलाब नांगरे, मारुती आनंदा हजारे, प्रवीण दत्तात्रय नांगरे, दादासो पवार आणि रावसाहेब सागर या शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, लिंगे वस्तीवर वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. झाड अंगावर कोसळल्याने संजय दत्तात्रय लिंगे यांची म्हैस जागीच दगावली. विलास जगन्नाथ लिंगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली, तर धनंजय लिंगे यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आटपाडी शहरातही अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच युवासेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे पाटील यांनी आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. आमदार बाबर यांनी तत्काळ कृषी अधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
आमदार बाबर यांनी अनेक शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या बागा पाहून शेतकरी पूर्णपणे खचून गेले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी आर्त मागणी परिसरातून होत आहे.