Atpadi Gutkha Seized: आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त

कर्नाटकातून सांगलीकडे निघालेला प्रतिबंधित माल पकडला
 Gutkha seized
Gutkha seized (File Photo)
Published on
Updated on

आटपाडी : येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या तस्करीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जाणारा 'विमल' पानमसाला आणि 'व्ही-१' सुगंधित तंबाखू भरलेला ट्रक अधिकाऱ्यांनी पकडला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता विश्वनाथ हिरेमठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र शासनाने २० जुलै २०२६ पासून गुटखा, पानमसाला, खर्रा व सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच २९ जुलैरोजी सायंकाळी जवळे मंगल कार्यालय परिसरात संशयास्पद ट्रक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तातडीने तेथे छापा टाकला असता, एमएच-४२-बीएफ-८६६१ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ८.४४ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली. सुमारे ५ लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला असून एकूण १३.४४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. जप्त मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

प्राथमिक तपासात हा माल कर्नाटकातील तुमकूर येथून सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वाहनचालक लहू अशोक चव्हाण (रा. कमलापूर, ता. सांगोला), वाहनमालक संभाजी बने, मालमालक दिलीप मस्के (रा. सांगोला), तसेच संबंधित पुरवठादार आणि उत्पादकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्यायसंहिता (बीएनएस)अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीत या अवैध व्यवसायामागील आर्थिक साखळीचा शोध घेऊन संघटित गुन्हेगारीचे स्वरूप आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या कारवाईतून गुटखा तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news