Sangli News| शेतकरी तहानले; अधिकारी गायब!

संतप्त शेतकऱ्यांचा ५ ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचा इशारा
Sangli News
आटपाडी : तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरताना आनंदराव पाटील, व्यासपीठावर तहसीलदार शीतल बंडगर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि शासकीय अधिकारी.
Published on: 
Updated on: 

आटपाडी : आटपाडी तालुक्यात पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीलाच संबंधित विभागांचे सक्षम अधिकारी गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. निर्णय घेणारे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे तहसीलदार शीतल बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक ठोस निर्णयाविना फोल ठरली. त्यामुळे पाणी संघर्ष चळवळीने ५ ऑक्टोबररोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

पाणी संघर्ष चळवळीने मोर्चाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार बंडगर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. बैठकीस तहसीलदार शीतल बंडगर, टेंभू योजनेचे उपअभियंता, तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे, महावितरणचे राजेश डावरे यांच्यासह माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील, भारत पाटील, डॉ. उन्मेष देशमुख, श्रीरंग कदम आणि शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत राजेंद्रअण्णा देशमुख, भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी तहसीलदारांचे आभार मानले. मात्र, वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम अधिकारीच उपस्थित नसतील, तर निर्णय कोण घेणार, असा सवाल आनंदराव पाटील यांनी उपस्थित केला. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांकडून ठोस पर्याय मिळाला नाही. महावितरणकडूनही अखंडित वीजपुरवठ्याची स्पष्ट हमी न मिळाल्याने बैठकीतील चर्चा केवळ औपचारिक ठरली.

शेतकऱ्यांनी पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याची व्यथा मांडत, पाणी कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतात पोहोचले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली. वंचित गावांतील पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी, पाणी मोजणीसाठी मीटर बसवावेत, मोठ्या क्षमतेच्या पाईपलाईन उभाराव्यात, राजेवाडी तलाव कायमस्वरूपी भरावा तसेच उरमोडीचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

पाण्याअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. त्यामुळे केवळ बैठका आणि आश्वासनांवर भागणार नाही. प्रत्यक्ष पाणी आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. ५ ऑक्टोबरच्या मोर्चावेळी सर्व विभागांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गावनिहाय प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा पाणी संघर्ष चळवळीने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news