

आटपाडी : आटपाडी तलावानजीक ओढा पात्रातील गवत आणि झाडांना आज दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. ओढ्यालगत गव्हाचे पीक निघाल्यानंतर राहिलेले तण जाळण्यात आले होते. त्याची ठिणगी ओढ्यात वाळलेल्या गवतात पडली. ओढ्याच्या पात्रातील सुमारे एक किलोमीटर अंतरातील गवत, शिसवाची झाडे, झुडूपे, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल आगीत जळाल्या.
आटपाडी तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी ओढा आहे. हा ओढा ग्रामदैवत अंबाबाई मंदिराजवळून वाहतो. तो तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या शुक ओढा पात्राला मिळतो. तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी शेती आहे. तलावाच्या पायथ्याशी शेतातील गव्हाचे तण जाळल्यावर त्याची ठिणगी ओढ्यातील गवताला लागली.
तीव्र उन्हाचा तडाख्याने आणि जोरदार वाऱ्याने ही आग पसरली. मगर वस्ती नजीक वाहणाऱ्या ओढ्यातील एक ते दीड किलोमीटर परिसरात ही आग पसरल्याने वाळलेले गवत, लाकडे, झुडूपे या आगीत जळून खाक झाली. नगरपंचायतच्या जुन्या पाणी पुरवठा विहिरी लगतच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन आणि काही केबल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या .चार पाच तास धूमसणारी ही आग सायंकाळी पाचच्या आसपास आटोक्यात आली.