Sangli Death Penalty | आटपाडीतील चिमुकलीवरील अत्याचार-खून प्रकरणी वृद्ध आरोपीला फाशी

दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप; विटा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Atpadi Minor Assault  Case
शिवाजी काळेलPudhari
Published on
Updated on

Atpadi Minor Assault Case

विटा : आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी विटा सत्र न्यायालयाने आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल (वय ७०, रा. काळेल वस्ती, गळवेवाडी, ता. आटपाडी) याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी काम पाहिले.

७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी, ८ जानेवारी रोजी गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३०२, २०१ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला.

Atpadi Minor Assault  Case
Sangli Ganpati Temple Dispute : गणपती मंदिरातील पूजेच्या मानपानावरून वाद

सुरुवातीचे सुमारे सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, २६ जुलै २०१८ रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात शिवाजी काळेलविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान पीडित मुली व त्यांच्या आईंचे न्यायालयात कलम १६४ अन्वये जबाब नोंदविण्यात आले. या जबाबातून ७ जानेवारी २०१८ रोजीच्या घटनेच्या दिवशी आरोपी आणि मृत मुलगी एकत्र असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेत काळेल याला चिमुकलीच्या हत्या प्रकरणातही मुख्य आरोपी केले.

तपासात आरोपीने अत्याचारानंतर मुलीची हत्या करून मृतदेह घरातील लोखंडी कणगीत लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाइकांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकरणाचा छडा लावणाऱ्यास आपण स्वतः ५० हजार रुपये बक्षीस देऊ, असेही तो सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह घराजवळील जगमाईच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

Atpadi Minor Assault  Case
Sangli Crime : माधवनगरमध्ये धारदार शस्त्राने वार करून सराईत गुन्हेगाराचा खून

पोलिसांनी तपासादरम्यान लोखंडी कणगी व चादर जप्त केली. चादरीवर पीडित मुलीची टिकली आढळून आली. तिच्या आजी-आजोबांनी ही टिकली ओळखली. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील अहवालात कणगीत मानवी रक्त व शरीरातील द्रव आढळल्याचे स्पष्ट झाले. हे पुरावे न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाचे ठरले.

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १९ साक्षीदार तपासले. अंतिम युक्तिवादात सरकारी वकील आरती देशपांडे-साठविलकर यांनी आरोपी प्रतिकार करण्यास असमर्थ असलेल्या अल्पवयीन मुलींना लक्ष्य करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. चिमुकलीवरील अत्याचार व खून हा गंभीर स्वरूपाचा आणि दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारातील गुन्हा असल्याने कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.

Atpadi Minor Assault  Case
Sangli Gas Cylinder Explosion: सुसलाद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

न्यायालयाने युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरत चिमुकलीवरील अत्याचार व खून प्रकरणात शिवाजी काळेल याला फाशीची शिक्षा, तर अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तपास अधिकारी लक्ष्मण गुरव आणि देडे यांच्या तपासातील प्रयत्नांचे सरकारी वकिलांनी विशेष कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news