

आटपाडी : तालुक्यातील एकूण पाच प्रमुख जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नतीची मान्यता मिळाली आहे. पडळकरवाडी, जांभुळणी, कामथ, नांगरेमळा आटपाडी (प्रजिमा 168), प्रजिमा 50 पासून मासाळवाडी, बनपुरी, बाळेवाडी, गोमेवाडी ते राज्य मार्ग 151 रस्त्यास मिळणारा रस्ता (प्रजिमा 169) राज्य मार्ग 151 पासून कौठुळी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी, य.पा.वाडी, माडगुळे (प्रजिमा 170) प्रजिमा 25 खरसुंडी, बाळेवाडी, करगणी, शेटफळे, चिंध्यापीर प्रजिमा 50 मिळणारा रस्ता (जिल्हा प्रजिमा 171), शुक्राचार्य हिवतड गोमेवाडी अर्जुनवाडी, खरसुंडी (जिल्हा प्रजिमा 172) या पाच रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नतीची मान्यता मिळाली आहे.
या निर्णयाने तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, रुंदीकरण व वाहतूक सुविधांना गती मिळणार आहे. यासंदर्भात अनिलभाऊंच्या मागणीसह आमदार सुहास बाबर यांनी राज्य शासन, संबंधित विभाग व अधिकार्यांशी सातत्याने पाठपुरावा करून हा निर्णय मंजूर करून घेतला. यामुळे शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल, ग्रामीण भागातील लोकांना शहराशी सहज संपर्क साधता येईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तालुक्यातील ग्रामस्थांनी महायुती शासनाचे, आमदार सुहास बाबर यांचे आभार मानले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात रस्ता हस्तांतरित झाल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची देखभाल, डांबरीकरण व दर्जेदार दुरुस्ती होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिक निधी उपलब्ध होत असल्याने विकासकामे वेळेत पूर्ण होतील. रस्त्यांचा दर्जा वाढेल, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक आणि आपत्कालीन सेवा सुलभ होतील, तसेच उद्योग, शेतीमाल वाहतूक, शिक्षण व आरोग्य सुविधा यांना गती मिळून स्थानिक विकासाला चालना मिळेल. येत्या काही दिवसात आटपाडी तालुक्याला तीन राज्यमार्ग मिळणार आहेत.