

आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेवर पडलेल्या दरोड्यानंतर बँक प्रशासन झोपेतून जागे झाले आहे. चोरीच्या नाट्यमय घटनेत खिडकी तोडून चोरट्यांनी थेट लॉकर रूममध्ये पोहोचल्याने तालुका हादरला होता. आता बँकेने सुरक्षेचे डागडुजी काम हाती घेतले असले, तरी सुरक्षेच्या मूळ बिंदूंवर अद्यापही तीच ढिलाई कायम असल्याचे चित्र समोर येत आहे.
दरोड्यानंतर शाखेतील सर्व खिडक्यांना जाड लोखंडी पत्रे आणि अँगल बसवण्यात आले. त्यामुळे खिडकीतून प्रवेश करणे जवळपास अशक्य झाले आहे. त्याचबरोबर जुने लॉकर काढून नवे, आधुनिक व अधिक सुरक्षित लॉकर बसवले गेले आहेत. तिजोऱ्याही उच्च दर्जाच्या व अधिक मजबूत प्रकारच्या बसवण्यात आल्या आहेत. ह्या उपाययोजना वरवर चमकदार दिसत असल्या, तरी बँकेचा खरा किल्ला मानला जाणारा स्ट्रॉंग रूम आणि लॉकर रूमचे मुख्य दरवाजे अजूनही जुने, साधेच आहेत — ना जाड लोखंडी दरवाजे, ना डिजिटल लॉक, ना अलार्म सिस्टम!
‘खिडकी बंद केली, पण मुख्य दरवाजाच उघडा ठेवला
त्यामुळे ‘खिडकी बंद केली, पण मुख्य दरवाजाच उघडा ठेवला तर काय साधले?’ असा सवाल नागरिकांतून जोरकसपणे उपस्थित होत आहे. ग्रामीण भागासाठी ही शाखा शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, सामान्य नागरिक यांचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता सर्वंकष धोरण राबवणे गरजेचे असतानाच बँकेकडून घटनेनंतरची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. खातेदारांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर बाहेरच्या खिडक्यांसोबतच आतल्या किल्ल्यांनाही कवच देणे आवश्यक आहे. अन्यथा दरोड्यानंतर केलेल्या सुरक्षा उपाययोजना फक्त डोळेझाक आणि दिखावा म्हणूनच गणल्या जातील, अशी चर्चा झरे परिसरात रंगली आहे.