

आटपाडी : आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब पणन संकुलासाठी आधुनिक 'ग्रेडिंग व सॉर्टिंग' मशीन देण्याची ग्वाही पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली असल्याची माहिती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आटपाडी बाजार समितीत दररोज ३०० ते ४०० टनांपर्यंत डाळिंबाची मोठी आवक होते. या आधुनिक यंत्रणेमुळे डाळिंबाची आकारानुसार अचूक व वेगाने प्रतवारी (ग्रेडिंग) होणार आहे. प्रतवारी जलद झाल्याने सौदे प्रक्रिया आणि शेतमालाची हाताळणी सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले की, कोल्हापूर येथे पणन मंत्र्यांनी डाळिंब सौदे बाजाराची माहिती घेऊन या यंत्रणेचे आश्वासन दिले. डाळिंब संकुलात गाळ्यांसमोर पेव्हिंग ब्लॉक, गटार, पॅक हाऊस, वे-ब्रीज आणि सौरऊर्जा प्रकल्पाची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. तसेच आटपाडीतील 'कोल्ड स्टोअरेज'ची क्षमता ५० वरून १०० टन करण्यात आली असून, ते लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान, दिघंची येथे १ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या वेअर हाऊसमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसोबत त्यावर ७५ टक्क्यांपर्यंत कर्जसुविधा मिळणार आहे. हे गोदाम नाममात्र भाड्यात उपलब्ध करून दिले जाईल.
बाजार समितीतील विकास कामांचा प्रारंभ आणि दिघंची येथील वेअर हाऊसचे उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी पणनमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.