आटपाडी शहर पोस्टरबाजांच्या विळख्यात; प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त

Sangali news | या बेजबाबदार प्रकारामुळे शहराची विद्रूप अवस्था झाली असून, स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे
आटपाडी शहर पोस्टरबाजांच्या विळख्यात; प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त
Published on
Updated on

आटपाडी : शहर सध्या पोस्टरबाजीच्या उन्मादात सापडले असून, शहर अक्षरशःबकाल झाले आहे. कोणताही सण, वाढदिवस, राजकीय निवड, महामानवांची जयंती-पुण्यतिथी असो किंवा एखादे किरकोळ यश – प्रत्येक निमित्ताने शहरातील भिंती, चौक, वीज खांब, सार्वजनिक इमारती आणि अगदी रस्त्यांच्या कडेलाही पोस्टरांचा मारा सुरू आहे. परवानगी, नियम किंवा शिस्त यांचा लवलेशही दिसत नसून “जिथे जागा दिसेल तिथे पोस्टर ठोकायचंच” असा जणू अलिखित फतवा निघाल्याचे चित्र आहे.

या बेजबाबदार प्रकारामुळे शहराची विद्रूप अवस्था झाली असून, स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यांच्या कडेला, चौकात किंवा अन्यत्र लावलेली मोठमोठी पोस्टर्स वाहनचालकांचे लक्ष विचलित करत असून, अपघातांचा धोका वाढत आहे. शहरातील नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली असून, “हे शहर आहे की पोस्टरांची भिंत?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

अधिक गंभीर बाब म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतरही ही पोस्टर्स तशीच लोंबकळत राहतात. पावसात भिजून, वाऱ्याने फाटून रस्त्यावर साचलेली ही कागदी घाण शहराच्या स्वच्छतेवर काळा डाग ठरत आहे. एकीकडे स्वच्छतेच्या घोषणा देणारे आणि दुसरीकडे प्रत्यक्षात शहराचा बट्ट्याबोळ करणारे हे दुटप्पी धोरण नागरिकांच्या डोळ्यात खुपत आहे.

आटपाडी नगरपंचायतकडे याबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांचे या गंभीर प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक ठरत आहे. नियम केवळ कागदावरच राहणार का? की प्रशासन खरोखरच कारवाई करणार? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

पोस्टरबाजीवर तातडीने निर्बंध घालून, विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, शहरातील विद्रूप झालेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नियम लागू करावेत, अशी ठाम मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा “पोस्टरमुक्त आटपाडी” ही घोषणा फक्त कागदावरच राहील आणि शहराचा चेहरा कायमचा विद्रूप होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोस्टरबाज्यांच्या तावडीतून शासकीय कार्यालये देखील सुटलेली नाहीत. एस. टी. स्टॅंडची संरक्षक भिंत, पंचायत समिती आणि अन्य शासकीय कार्यालयांच्या परिसरात,भिंतीवर पोस्टर्सचे अघोषित साम्राज्य पसरले आहे. संबंधित कार्यालये याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने पोस्टरबाजांचे चांगलेच फावले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news