

सांगली : ऑनलाईन व्यवसायामुळे एटीएमच्या व्यवहारांमध्ये तीन वर्षांत जवळपास 80 टक्के घट झाली आहे. सांगली जिल्ह्यातील एटीएममधील तीन वर्षाचा व्यवहार दहा हजार कोटी रुपयांवरून आता दोन हजार कोटी रुपयांवर आला आहे. दुसर्या बाजूला वाढत्या ऑनलाईन व्यवसायांमुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात 410 लोकांची सुमारे पाच कोटींची फसवणूक झाली आहे. एटीएम बंद पडली नसली तरी, त्यांच्यातील व्यवहार आता 20 टक्क्यांवर आला आहे.
जिल्ह्यामध्ये तीन वर्षांपूर्वी आठवड्याला एटीएममधून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा व्यवहार होत होता, आता तो यावर्षी 38 ते 40 कोटी रुपयांवर आला आहे. दिवसेंदिवस यात घटच होत आहे. ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल पेमेंटमुळे लोक आता बँकेत किंवा एटीएममध्ये कमी जातात, परिणामी एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बिल भरणा आणि विविध अॅप्सद्वारे पैसे भरण्याच्या सुविधांमुळे लोक आता बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याचे टाळत आहेत. ऑनलाईन व्यवहार बँकेसाठी कमी खर्चाचे ठरत आहेत. त्यांना एटीएम मशीन, कर्मचारी आणि इतर खर्चांवर जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि इतर पेमेंट अॅप्समुळे व्यवहार करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे एटीएमची गरज कमी झाली आहे.
काही बँकांनी वाढत्या खर्चामुळे आणि कमी वापरामुळे एटीएम बंद करायला सुरुवात केली आहे. तसेच काहींना बँकेत जाणे किंवा लांब रांगेत उभे राहणे वेळखाऊपणाचे वाटत आहे. यामुळे एटीएममधून पैसे काढणार्यांची संख्या कमी झाली आहे आणि ऑनलाईन व्यवहारांची संख्या वाढली आहे. मात्र वाढत्या ऑनलाईन व्यवसायामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, फसवणूक करणारे नवीन आणि अधिक गुंतागुंतीचे मार्ग शोधत आहेत. याचा परिणाम म्हणून, व्यवसाय आणि ग्राहक दोघांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात गेल्या वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीच्या सुमारे बाराशे घटना घडल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 410 लोकांची सुमारे पाच कोटींची फसवणूक झाली आहे. याबाबत गुन्हे नोंद असून, तपास सुरू आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या जवळपास रोजच तक्रारी येत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी दाखल होत नाहीत.