

शिराळा शहर : शिंगटेवाडी (ता. शिराळा) येथील सृष्टी चंद्रकांत शिंगटे या शालेय विद्यार्थिनीला ॲटलॉस मॉथ या जातीचे फुलपाखरू घराजवळील झाडावर आढळून आले. या फुलपाखराच्या पंखाच्या दोन्ही टोकांवर नागाच्या तोंडासारखी हुबेहूब आकृती असते. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी शिंगटेवाडी परिसरातील लोक जमले होते.
वन विभागाचे शिराळ्यातील वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, ॲटलॉस मॉथचा रंग बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला ॲटलॉस मॉथ म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या फुलपाखराचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने, या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे फुलपाखरू अखेरचा श्वास घेते.
रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारे हे फुलपाखरू निशाचर आहे. क्वचितच ते दिवसा आढळते. मात्र सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात ते प्रकर्षाने दिसते. हे फुलपाखरू लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबूवर्गीय झाडांवरच अधिक आढळते. तिथेच त्याचा प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. ही अंडी दहा ते चौदा दिवसात उबवून त्यातून अळी बाहेर येते. ही अळी 35 ते 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. 21 दिवसानंतर कोशातून फुलपाखरू बाहेर येते. त्यानंतर अंडी घालून ते फुलपाखरूही मरते, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.