

आष्टा : आष्टा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, चोरट्यांनी आता थेट पोलिस प्रशासनालाच आव्हान दिले आहे. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्मवीर रस्त्यावरील तीन दुकाने चोरट्यांनी एकाच रात्री फोडली. रोख रकमेसह मोबाईल लंपास केले. विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांतील चोरीची ही दुसरी मोठी घटना असूनही पोलिसांत अद्याप याची नोंद नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवार, दि. 2 जानेवारीरोजी मध्यरात्री चोरट्यांनी कर्मवीर रोडवरील दुकानांना लक्ष्य केले. शंतनू जनरल स्टोअर्स या दुकानाचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील 9 ते 10 हजार रुपयांची रोकड आणि 3 मोबाईल लंपास केले. चोरट्यांनी दुकानातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आहे. समर्थ आयुर्वेदिक क्लिनिकचेे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख 500 रुपये चोरले. याशिवाय कृष्णा बझार या दुकानाचेही कुलूप तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
चोर आम्हीच शोधायचे का?; नागरिकांचा संतप्त सवाल
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही. चोरटे दुकानात शिरून तासन् तास निवांतपणे चोरी करतात आणि तिथेच विश्रांती घेऊन पसार होतात. तक्रार करायला गेल्यावर ‘तुम्हाला कोणावर संशय असेल तर सांगा, चौकशी करतो’, असे उत्तर पोलिसांकडून मिळते.
15 दिवसात चोरीची दुसरी घटना
15 दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील हेमंत वाडेकर यांच्या दुकानातून 4 हजार रुपये, गायकवाड यांच्या दुकानातून 15 हजार रुपये व महागडे प्रोटीन पावडरचे डबे आणि केशर फूड्समध्ये चोरी झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही आणि दुकानदारांनी तक्रार देऊनही, पोलिस ठाण्यात अद्याप अधिकृत गुन्हा नोंद झालेला नाही.