Sangli News| ‘भेसळीचे साम्राज्य’ पुन्हा जोराने उफाळले

दसरा-दिवाळीचा साधला मुहूर्त; 'ऑफर'च्या नावाखाली भेसळयुक्त जिन्नस
Sangli News
‘भेसळीचे साम्राज्य’ पुन्हा जोराने उफाळले
Published on: 
Updated on: 

उत्तम कदम

​आष्टा : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून नियमबाह्य आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यवसायांविरोधात या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही महिन्यांपूर्वी आष्टा शहर व परिसरात भेसळखोरांचे धाबे दणाणले होते. किराणा दुकाने, बझार, बेकरी आणि हॉटेल्समधून भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे पदार्थ अचानक गायब झाले होते. तर यातून आपण आजवर आवडीने खात असलेले पदार्थ आरोग्याला घातक व 'स्लो पॉयझन' देणारे होते, याची जाणीव झाल्याने ग्राहकही चक्रावून गेले होते. मात्र, आता मुंढे इफेक्ट थोडासा कमी होताच, दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा भेसळीचे साम्राज्य पसरू लागल्याचे भीषण चित्र समोर येत आहे.

दसरा झाला. आता दिवाळी ही तोंडावर आली आहे. बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी फुलू लागली आहे. याच संधीचा फायदा घेत नफेखोर आणि बेकायदेशीर व्यावसायिकांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धाकाने ज्या अनब्रँडेड वस्तू, मुदत संपलेले पदार्थ आणि घातक रसायने वापरलेले खाद्यपदार्थ गोदामांत लपवले गेले होते, ते आता पुन्हा हळूहळू बाजारात येऊ लागले आहेत. याची चर्चादेखील होऊ लागली आहे.

काही अपवाद वगळता बझार आणि किराणा दुकानांमध्ये 'सवलत' व 'ऑफर'च्या नावाखाली मुदत संपलेले किंवा भेसळयुक्त जिन्नस खपवण्याचा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. बेकरीमधील सुटे टोस्ट, खारी, क्रीमरोल आणि उत्पादनाची किंवा मुदत संपल्याची तारीख नसलेले निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस येत आहेत. हे पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे तेल आणि वनस्पती तुपापासून बनवले जात असल्याचे सांगण्यात येते.

​हॉटेल्स आणि चायनीज गाड्यांवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरोग्याला गंभीर इजा पोचवणारा 'अजिनोमोटो' आणि प्रतिबंधित भडक रंगांचा अतिवापर, तर पुन्हा खुलेआम सुरू झाला आहे. तसेच स्वस्त, अनधिकृत खाद्यतेल आणि पानटपऱ्यांवर छुप्या मार्गाने मिळणारा गुटखा, मावा बाजारात पुन्हा सर्रास उपलब्ध होऊ लागला आहे.

​​दसरा-दिवाळीच्या काळात मिठाई, मावा, तेल आणि सुक्या मेव्याची मागणी प्रचंड वाढते. याच काळात भेसळयुक्त अन्नाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ धडक कारवाई करावी, अशी मागणी आष्टा शहरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास सणांवर भेसळयुक्त अन्नाचे सावट पसरण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news