

आष्टा : आष्टा नगरीचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवातील थळपूजा व जोगण्या हा खेळ सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रविवारी रात्री या उत्सवातील सोळा खेळगडी एका खेळगड्याच्या घरी जमले. याठिकाणी पूजा झाली. येथून सर्व खेळगडी व मानकरी थोरात सरकार व अन्य मानकऱ्यांच्या घरातील नैवेद्य मागून घेऊन दलित समाजातील थळपूजेसाठी गेले. दलित समाजाची पूजा स्वीकारून सर्वजण वाजत-गाजत श्री चौंडेश्वरी देवळात आले. याला थळ उठविणे असे म्हणतात.
जोगण्या...
देवीच्या सैन्याने शोध घेऊनही दैत्य सापडला नाही. त्यामुळे श्री चौंडेश्वरीदेवी स्वत: हातात शस्त्र घेऊन दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडते. हे कथानक या खेळामधून दाखविले जाते. जोगण्या होण्याचा मान दोन सुतार, एक कुंभार व दमामे यांच्याकडे आहे. जोगण्या होणारे खेळगडी अंबाबाई मंदिरात येऊन जोगिणीचे रूप घेण्यासाठी रंगले. युद्धाचा पेहराव करून रणचंडिकेच्या रूपात व रणवाद्यांच्या गजरात सोमवारी पहाटे जोगण्या अंबाबाई मंदिरातून बाहेर पडल्या. यामध्ये दोन सुतार जोगण्या व एक दमामे यांची जोगणी असते. मिरवणुकीवेळी जोगण्यांच्या हातातील चांदीची वाटी कोणी पळवू नये म्हणून सर्वजण अतिशय दक्षता घेतात. विशिष्ट ताला-सुरात वाजणाऱ्या रणवाद्यांच्या गजरात छत्र्या, चामर, चौंडके, रणशिंग, कैताळ पावा यांसह हा लवाजमा कापडपेठेत आल्यानंतर त्यांना चौथी कुंभार जोगणी मिळाली. या चार जोगण्या शहरातील मारुती\ मंदिराच्या पाठीमागील ओढ्याशेजारच्या वीरशैव कक्कय्या समाजातील थड्याजवळ आल्यानंतर त्यांची पहिली पूजा झाली. यानंतर मिरजवेशी महिलांनी जोगण्यांची पूजा केली. याठिकाणी खेळगडी व मानकऱ्यांना पानाचे विडे, घुगऱ्यांचा प्रसाद वाटण्यात आला.