Ashta Water Scheme : आष्ट्यासाठी नवीन पाणी योजना

74.28 कोटींचा प्रस्ताव ः तांत्रिक मंजुरी; आता प्रतीक्षा प्रशासकीय मंजुरीची
 Water Scheme
आष्ट्यासाठी नवीन पाणी योजनाPudhari File Photo
Published on
Updated on

आष्टा : आष्टा शहराच्या वाढत्या विस्तारासह भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 74.28 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी पालिकेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती नंदकुमार बसुगडे यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासकीय मंजुरीअभावी रखडलेल्या या प्रकल्पाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती बसुगडे यांनी यावेळी केली.

या योजनेचे स्वरूप आणि तांत्रिक बाजू याविषयी माहिती देताना सभापती बसुगडे म्हणाले, आष्टा शहरासाठी महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत 74 कोटी 28 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याची प्रशासकीय प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या महत्त्वाकांक्षी योजनेत पुढील बाबींचा समावेश आहे.

नवीन जलवाहिनी : संपूर्ण शहरात सुमारे 140 किलोमीटर अंतराची नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे.

पाण्याच्या टाक्या : गांधीनगर, बहुउद्देशीय हॉल आणि शुद्धीकरण प्रकल्प परिसर अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी नवीन पाणी टाक्यांची उभारणी केली जाणार आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्प : नवीन अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबरोबरच जुन्या प्रकल्पाची दुरुस्ती करून त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. सभापती बसुगडे यांनी निवेदनात सध्याच्या पाणी पुरवठ्यातील त्रुटींकडे लक्ष वेधले असून त्यांनी पुढील बाबी नमूद केल्या आहेत.

जुनी यंत्रणा : शहरातील सध्याची मुख्य पाईपलाईन 15 ते 20 वर्षे जुनी झाली असून तिची कार्यक्षमता पूर्णपणे घटली आहे. गळतीचे प्रमाण : लोखंडी पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होत आहे. लोकसंख्येचा ताण : शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. सध्या पाणीपुरवठा करण्यासाठी पंपिंग मशीन 24 तास चालू ठेवूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

सहा महिन्यांपासून आष्टा ते शिराळा या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने अनेक प्रभागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदाराशी समन्वय साधून ही फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी बसुगडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news