तासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसडा मारून लांबविले. याप्रकरणी कविता केशव चव्हाण (वय 48 रा, आरवडे) यांनी अज्ञात दोन चोरट्याचा विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी कविता या त्यांच्या आरवडे ते मांजर्डे रस्त्यावर असणाऱ्या शेतात वैरण काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी भीती दाखवून कविता यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून काढू घेतले. काही क्षणातच दोघेही दुचाकीवरून पसार झाले.
ही घटना सोमवार दि. 2 डिसेंबररोजी दुपारी घडली. घटनेनंतर कविता या चोरट्यानी दाखविलेल्या भीतीने घाबरून गेल्या होत्या. त्यामुळे घटना घडून दहा दिवसानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची नोंद तासगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.घटनेनंतर आरवडे परिसरात विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याचा छडा लावून चोरट्यांवर जरब बसवावी, अशी मागणी होत आहे.