

तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा महेश पाटील यांची, तर उपसभापतिपदी सुखदेव भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाच्या सभापती, उपसभापती पदाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. निवडणूक बिनविरोध होताच समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
गेली 35 वर्षे तासगाव पंचायत समितीवर आर. आर. पाटील गटाची निर्विवाद सत्ता होती. प्रत्येक निवडणुकीत विरोधी माजी खासदार संजय पाटील गट जिद्दीने लढत असताना, त्यांना कधी बहुमतापर्यंत जाता आले नाही. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संजय पाटील गटाने बहुमत मिळवायचेच, या उद्देशाने निवडणूक व्यूहरचना केली. त्यात त्यांना यश आले. पंचायत समितीच्या बारा जागापैकी तब्बल आठ जागा जिंकून प्राबल्य दाखवून दिले. आमदार रोहित पाटील गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले, तर पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या भाजपने एक जागा जिंकून पंचायत समितीच्या सभागृहात चंचुप्रवेश केला आहे.
सकाळी माजी खासदार संजय पाटील यांच्या बाजार समिती आवारातील कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी सभापती आणि उपसभापती पदासाठी अनुक्रमे अरुणा पाटील आणि सुखदेव पाटील यांची नावे निश्चित करण्यात आली. नावे निश्चित झाल्यानंतर मोजक्या सदस्यांच्यासमवेत काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सभापती पदाच्या उमेदवार अरुणा महेश पाटील व उपसभापती पदाचे उमेदवार सुखदेव भीमराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अध्यासी अधिकारी कविता लष्करे यांच्याकडे दाखल केले. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होताच विरोधी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या कल्पना निवास पाटील यांनी सभापती पदासाठी, तर विद्याराणी प्रकाश चव्हाण यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी दाखल केली.
उमेदवारी छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यावेळी आमदार पाटील गटाचे तीनही सदस्य सभागृहात उपस्थित होते. मात्र उमेदवारी माघार घ्यायच्या विहित वेळेत आमदार गटाच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने संजय पाटील गटाच्या सभापती पदाच्या अरुणा पाटील व उपसभापती पदाचे उमेदवार सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी कविता लष्करे यांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात संजय पाटील गटाचे सर्व आठ सदस्य व भाजपच्या राजेश्वरी पाटील असे नऊ सदस्य उपस्थित होते. निवडणुकीतून माघार घेताच आमदार रोहित पाटील गटाच्या तीनही सदस्यांनी सभागृह सोडले.