

कडेगाव : सांगलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दहा ते पंधरा वर्षे जुन्या रुग्णवाहिका वापरल्या जात आहेत. परंतु या जुन्या वाहनांचा काही भरोसा नाही.त्यामुळे नवीन रुग्णवाहिकांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी अत्यंत गरजेचे म्हणजे रुग्णवाहिका असते. या रुग्णवाहिकेसाठी सांगली जिल्ह्याला निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पंधरा ते वीस वर्षे जुन्या असलेल्या रुग्णवाहिकाच वापरल्या जात आहेत. त्यातील अकरा रुग्णवाहिका रुग्णांची वाहतूक करतात. या वाहनांचा प्रवास जवळपास 10 ते 15 लाख किलोमीटर झाले आहे. त्यामुळे नवीन रुग्णवाहिकांची सांगली जिल्ह्याला गरज आहे. याबाबत जिल्हा परिषदेने प्रस्ताव देखील पाठवलेले आहे.परंतु याबाबत राज्य सरकाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
ते म्हणाले, जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी झालेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अत्याधुनिक रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण 24 रुग्णवाहिका आहेत. परंतु, जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग गेलेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाढत्या अपघातांमुळे या ठिकाणी रुग्णवाहिकांची संख्या देखील वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केली.