

जत शहर : शासनाने जत येथे एमएच 59 या नवीन नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाने), करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.
शासन निर्णयानुसार जत येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय स्थापन करून एमएच 59 हा नवा क्रमांक देण्यात आला आहे. ही सुविधा जत आणि परिसरातील वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यालयासाठी शासकीय अथवा खासगी जागा भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ केली जाणार आहे. सुरुवातीला आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्यात येणार असून, नंतरच्या टप्प्यात नवीन पदे निर्माण करण्यात येतील. वाहतूक नियंत्रण व तपासणीसाठी एक इंटरसेप्टर वाहन मंजूर करण्यात आले आहे. मात्र, ते घेण्याआधी वाहन आढावा समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे वाहतूक शिस्त राखण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यालयासाठी येणारा आवर्ती व अनावर्ती खर्च बी-3, मुख्य लेखाशीर्ष 2041 वाहनांवरील कर या खात्यातून भागवण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार असून, तोपर्यंतचा खर्च सध्याच्या निधीतून भागविण्याचे आदेश दिले आहेत.