

सांगली ः ‘शक्तिपीठ’विरोधात 1 जुलैरोजी सकाळी 10 वाजता अंकली (ता. मिरज) येथील चौकात करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन शेतकर्यांच्या लक्षणीय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. मोजणी करण्यासाठी येणार्या अधिकार्यांना पिटाळून लावा, असे आवाहन करण्यात आले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासत बारा जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलिस बंदोबस्तात सुरुवात केली आहे. सरकारच्या या कृतीविरोधात सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीस महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी आदी उपस्थित होते.
याबाबत महेश खराडे म्हणाले, याअगोदर संवाददूत म्हणून आलेल्या अधिकर्यांना शेतकर्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल. कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकर्यांनी एकत्रित येत अधिकार्यांना अक्षरशः पळवून लावले.
सांगली जिल्ह्यातील 19 गावांतील शेतकर्यांनी तसेच महापूरबाधित जनतेने 1 जुलैरोजी 10 वाजता अंकली चौकात मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.