

सांगली ः नागपूर ते गोवा या ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात आज, मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंकली चौक येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शेतकरी सहभागी होणार आहेत.
याबाबत ‘शक्तिपीठ’ महामार्गबाधित शेती बचाव समितीतर्फे उमेश देशमुख यांनी सांगितले की, सध्या नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग आहे, त्यावर पुरेशी वाहतूक नाही. त्यातच या रस्त्याला समांतर असा नागपूर ते गोवा महामार्ग करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. ज्या भागातून हा मार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकर्यांचा याला तीव्र विरोध आहे. यासंदर्भातील हरकती शेतकर्यांनी दाखल केलेल्या आहेत. तरीही सरकारने हा महामार्ग जबरदस्तीने करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. पोलिस बंदोबस्तात जमिनीची मोजणी सुरू आहे. या अन्यायाविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये ‘शक्तिपीठ’ महामार्गबाधित शेती बचाव समितीमधील शेतकरी, राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.