Aniket Kothale murder case: युवराज कामटेकडून न्यायालयाची दिशाभूल

ॲड. उज्ज्वल निकम : आज पुन्हा होणार सुनावणी
Aniket Kothale murder case
Aniket Kothale murder casePudhari
Published on
Updated on

सांगली : बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे हा स्वतःच्या बचावासाठी न्यायालयाची दिशाभूल करत आहे. त्यासाठी गुन्ह्यावेळी मी नव्हतो, ही स्वाक्षरी माझी नाही, असे अनेक खोटे दावे तो करत असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर केला. मंगळवारी (दि. 17) पुन्हा या खटल्याची सुनावणी होणार आहे.

ॲड. निकम म्हणाले, कामटे याचे हे सर्व दावे हेतुपुरस्सर दिशाभूल करण्यासाठीच होते. कामटे आपले कृत्य लपवण्यासाठी खोटे बोलत आहे. यावेळी ॲड. निकम यांनी या खटल्यातील साक्षीदार श्रीकांत बुलबुले आणि तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्याबाबतदेखील युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षाचे वकीलही उपस्थित होते.

बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याचा दप्तरी अनिल लाड या दोघांनी तपासासाठी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी यांना कोठडीतून नेले होते. याबाबत हालचाल रजिस्टरवर उल्लेख आहे. त्यावेळी अनिकेतला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्षात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. मात्र घटनेदिवशी कामटे हा त्याठिकाणी नसल्याचे सांगत आहे. आपली स्वाक्षरी नसल्याचेही सांगतो. हे सारे दिशाभूल करण्यासाठी आहे, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी केला.

कामटे याच्या हस्ताक्षराबाबत तज्ज्ञांचा अहवालही ॲड. निकम यांनी न्यायालयासमोर मांडला. तसेच एका कोऱ्या कागदावर त्याच्या पंधरा स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्याने कारागृहातून केलेले अर्ज आणि त्याची पोहोच, यावरील स्वाक्षरी सारख्याच असल्याचे प्रात्यक्षिकही ॲड. निकम यांनी न्यायालयासमोर केले.

दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे या पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी कोथळे आणि भंडारे यांची माहिती घेतली. अधिक तपास करण्याचे आदेश कामटे याला दिले आणि त्या निघून गेल्या. त्यानंतर रात्री आठनंतर ही घटना घडली. उपअधीक्षक काळे या रात्री बारा वाजता पुन्हा शहर पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी कोठडीत त्यांना दोघे दिसून आले नाहीत. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी कामटे याला फोन केला, त्यावेळी दोघेजण पळाल्याचे कामटे याने त्यांना सांगितले. तशी पोलिस ठाण्यात नोंदही घेण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

यावेळी कामटेला केलेल्या मोबाईल कॉलबाबतचे पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. उपअधीक्षक काळे यांनी त्यावेळी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली, त्यावेळी त्यांना कोणतेही चित्र आढळले नव्हते, डीव्हीआर गायब झाला होता, असा युक्तिवाद करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news