

सांगली ः अनिकेत कोथळे खून-खटल्यात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक व मुख्य संशयित युवराज कामटे याच्या उलटतपासणीला सोमवारी जिल्हा न्यायालयात सुरुवात झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पण त्याने मला आठवत नाही, मोबाईल नंबर माहीत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. या खटल्याची पुढील सुनावणी आता 5 जुलै रोजी होणार आहे.
अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन जाळण्यात आला. या खटल्याची दुसरे जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी कामटे याची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उलटतपासणी घेतली. यावेळी कामटे याने अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली. घटनेदिवशी कामटे याने मिरजेतील सभागृहात असल्याचा दावा केला होता. पण त्यासंदर्भात त्याला कोणताही कागदोपत्री पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही. त्याने घटनेनंतर काही लोकांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. त्याबाबत त्याने आपला मोबाईल नंबर आठवत नसल्याचे सांगितले. कामटे याचे मूळ आडनाव कांबळे आहे. त्याने त्या नावावरच सीमकार्ड घेतले होते. नंतर त्याने गॅझेट करून कामटे नाव लावल्याचे अॅड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पण त्यालाही कामटे याने नकार दिला.
कागदपत्रांवरील सह्या माझ्या नाहीत, मला त्यावेळचे काही आठवतदेखील नाही, असाच पवित्रा त्याने यावेळी घेतला. यावेळी विशेष सरकारी वकील निकम यांच्याशी बचाव पक्षाचे वकील पाटील यांची शाब्दिक चकमक उडाली. पुढील सुनावणी 5 जुलैरोजी होणार आहे. यावेळी सीआयडीच्या अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक प्रमोद नलवडे, तपास अधिकारी, निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली.