

जत : अवघ्या 4 वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले, मात्र आईने हिंमत न हरता मोलमजुरी व टेलरिंग व्यवसाय करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलानेदेखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 26 व्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली. ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सोनलगीच्या सुपुत्राची. आनंद वैजनाथ देशमुख असे त्याचे नाव.
नुकत्याच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राज्यात 17 व्या क्रमांकाने आनंद देशमुख याने यश मिळवले आहे. आनंदचे वडील वैजनाथ यांचे 2003 साली अल्पशा आजाराने निधन झाले. परंतु, हे दु:ख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीत आनंदची आई कविता यांनी मजुरी व टेलरिंग व्यवसाय सुरू केला आणि मुलाचे शिक्षण केले. मुलगा आनंद यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे शिक्षण पूर्ण केले. पुढं पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण एम. व्ही. कॉलेज उमदी येथून 2019 साली घेतले. असे असताना लहानपणापासूनच आनंदला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले. हॉटेल, दवाखाने, गिरणीत मिळेल ते काम करत त्याने शिक्षण घेतले. त्याचा हा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे.
परिस्थितीचे चटके सहन करत शाळेसाठी लागणार्या पैशाची पूर्तता करण्यासाठी आनंद शाळा सुटल्यानंतर तसेच सुटीच्या दिवशी मिळेल त्या ठिकाणी काम करायचा. काम करता करता पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतरही परिस्थितीने पाठ सोडली नाही. आनंदने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. मिळेल ते काम करतच सन 2022 मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण सुरू असताना न्यायाधीश परीक्षेची तयारी केली.