

आटपाडी : दिवाळीनंतर नियमितपणे फिरायला गेलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावातील मित्रांच्या जीपला शनिवारी अमरावतीनजीक अपघात झाला होता. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या जखमीचाही रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे (वय 60, रा. गोमेवाडी) असे त्यांचे नाव आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
गोमेवाडी येथील मुकुंद देशपांडे, दस्तगीर मुलाणी, सुखदेव सरगर, पोपट जगताप व त्यांचा मुलगा प्रणव जगताप, बिरुदेव जावीर आणि सदाशिव सस्ते हे मित्र शेगाव येथे दर्शन घेऊन अमरावतीहून मध्य प्रदेशातील पंचमढी येथे जात होते. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा - अंजनगाव सुर्जी मार्गावरील हणवंतखेडा फाट्याजवळ त्यांची जीप आणि अकोट आगाराच्या एसटी बसची भीषण धडक झाली होती. अपघातात जीपचालक आप्पासाो आटपाडकर (रा. कलेढोण, ता. खटाव) आणि दस्तगीर मुलाणी (रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) हे दोघे जागीच ठार झाले होते, तर मुकुंद देशपांडे व कोतवाल बिरुदेव जावीर गंभीर जखमी झाले होते. रविवारी उपचारादरम्यान जखमी देशपांडे यांचाही मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. इतर प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश मस्के व सहायक निरीक्षक मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली होती. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच अनेक ग्रामस्थ आणि आप्तेष्टांनी अमरावतीकडे धाव घेतली होती.