

मिरज : नव्या-जुन्यांचा वाद न करता आपण यापुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे निवडून आले पाहिजेत. हा सांगली जिल्हा आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमय करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी मिरजेत केले. सांगली शहराला पाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासह इतर प्रश्नही सोडवू, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
येथील भोकरे कॉलेजच्या क्रीडांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यामध्ये काहींनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, हा महाराष्ट्र शेतकर्यांचा आहे. तरुण-तरुणींना रोजगार मिळवण्यासाठी नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधांचा पाया रचला. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा पुढे नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. मंत्रिपदाच्या ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या त्या सर्व जाती-धर्माच्या नेत्यांना दिल्या. सर्व जाती-धर्मामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सांगली जिल्ह्याला थोर स्वातंत्र्यसेनानींचा वारसा मिळाला आहे. अशा या सांगली जिल्ह्यामध्ये विकास करण्यासाठी उद्योग वाढले पाहिजेत. मोठमोठ्या उद्योगधंद्यांना येथे कसे आणता येईल हे आपण बघितले पाहिजे. महाराष्ट्रातून कुशल कामगार निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
पवार म्हणाले, शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील प्रश्न वेगवेगळे आहेत. लाडक्या बहिणींना मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. यावर विरोधकांनी टीका केली. पण आम्ही महिलांना शब्द दिला होता, वाट्टेल ते झाले तरी ही योजना राबवणार. योजना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडू देणार नाही. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला अधिक मजबूत करायचे आहे. मुलींना, महिलांना अधिक चांगले शिक्षण द्यायचे आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहिली नाही पाहिजे, असे आपले धोरण आहे. त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
पवार म्हणाले, आता वशिल्याचे दिवस संपले आहेत. ज्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून करायचे आहे. आता येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इथेच मागासवर्गीयांनाही न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. सर्वोच्च न्यायालयाने पण इतर मागासवर्गीय महिलांनाही पुरुषांप्रमाणेच संधी देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता सर्वसाधारण, मागासवर्गीय, आदिवासी स्त्री-पुरुष यांनाही समान संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागात चांगले काम करावे लागेल. संपूर्ण जिल्हा हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. ही माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे.
जनतेच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला आहे. श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिला आहे. तरुण मुख्यमंत्री व अन्य सहकारी महायुतीच्या माध्यमातून सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करत आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी कसा मिळवता येईल, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, कष्टकर्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, असे काम आम्ही करीत आहोत.
कमी-जास्त पाऊस पडून शेतकर्यांचे नुकसान झाले तर शेतकर्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करू, हे बळीराजाला सांगा. मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मी जे बोलतो तेच काम करतो. मी थोडा कडक स्वभावाचा आहे, पण सर्वांना न्याय देण्याचं काम करतो. आज सांगली जिल्ह्यातील आढावा घेत असताना, बेदाणा उत्पादक, हळद उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केला आहे. सांगलीमध्ये भरपूर पाऊस पडल्यानंतर जिथे जिथे पाणी साठते, त्याचा त्रास येथील नागरिकांना होतो. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.घरकुल देण्याचे काम हे आम्ही हाती घेतले आहे. आता एआयच्या माध्यमातून प्रगती होईल
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूर्वी आर्टस्, कॉमर्स, सायन्सचे शिक्षण घेतले जात होते. नवीन शिक्षण पद्धती आता आत्मसात केली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे महाराष्ट्रातील मुला-मुलींना शिकता आले पाहिजे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करीत आहे. शेतकर्यांसाठी आता 500 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे. ऊस, फूलशेती, फळबाग यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन व कमी पाणी, कमी खर्च, कमी बियाणे यामधून अधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे मार्गदर्शन आवश्यक आहे. गेली तीन वर्षे राज्य सरकारने यामध्ये संशोधन केले आहे. त्यामध्ये यश मिळवले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सिद्ध झाले आहे.