

- जालिंदर हुलवान
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिरजेत महाराणा प्रताप चौकात अवघ्या अठरा दिवसांपूर्वी सकाळी झालेली जाहीर सभा ही सांगली जिल्ह्यातील अखेरची सभा ठरली. सकाळीच सभा असून देखील या चौकामध्ये त्यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमामध्ये काँग्रेससह अनेक स्थानिक नेत्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता.
अजित पवार यांचे मिरजेतील काही नेत्यांशी चांगले संबंध होते. मिरज शहर व ग्रामीण भागामध्ये अनेकदा त्यांच्या सभा झाल्या आहेत. मिरजेतील पत्रकारांशी त्यांनी अनेकदा संवाद साधला होता. ‘तुमचे नेतेच निधीसाठी पाठपुरावा करण्यात कमी पडतात’ असे देखील त्यांनी नेत्यांसमोरच सांगून टाकले होते. मिरजेस निधी देण्यासाठीही ते अग्रेसर असायचे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान मिरजेतील क्रीडासंकुलाजवळील पटांगणावर अजित पवार यांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयामध्ये त्यांची सभा झाली होती.
मिरजेच्या विकासासाठी मिरासाहेब दर्ग्यासाठी 153 कोटी रुपयांचा निधी टप्प्या-टप्प्याने देणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यादिवशी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांपूर्वी म्हणजे 9 जानेवारी 2026 रोजी त्यांची मिरजेतील महाराणा प्रताप चौकात सकाळी जाहीर सभा झाली होती. या सभेसाठी ते विमानाने कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातून ते कारने मिरजेत आले. उद्योजक शरद जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि महानगरपालिकेसाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला होता. याच ठिकाणी त्यांनी नाष्टा देखील केला होता. या ठिकाणी उद्योजक शरद जाधव यांनी त्यांना मिरजेची प्रसिद्ध असलेली सतारीची प्रतिकृती भेट दिली होती. त्यानंतर त्यांची सभा झाली होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिरजेतून त्यांच्या पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून गेले. त्या नगरसेवकांचे अभिनंदनही अजितदादांनी केले होते.