

आटपाडी ः आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना, त्यांनी 37 वर्षांच्या कारकीर्दीत हवाई दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केले होते. राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक अशोक हॉलमध्ये बुधवार, दि. 4 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
उपराष्ट्रपती जगदीश धनखड, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. या पुरस्काराने माणदेशी आटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे हे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे पुत्र, तर पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. माणदेशातील आटपाडी तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाई दलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे. नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला.
पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कूलचे कमांडिंग ऑफिसर, पुणे येथील नाईन बी.आर.डी. आणि दिल्लीतील सी.एस.डी.ओ. युनिटचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे भारतीय हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे सिनिअर मेंटेनन्स स्टाफ ऑफिसर (एस.एम.एस.ओ.) आहेत.
पश्चिम एअर कमांडचे एस.एम.एस.ओ. म्हणून नोव्हेंबर 2022 पासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मेंटेनन्स व लॉजिस्टिक सप्लायची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. लेह-लडाख, चंदीगडसह सीमावर्ती भागाचा त्यांना मोठा अभ्यास आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पश्चिम एअर कमांडने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी 22 मेरोजी तेथील एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ व संपूर्ण कमांडचे अभिनंदन केले. एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केल्यानंतर अभिनंदन होत आहे.
आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय, देशमुख महाविद्यालय आणि राजारामबापू हायस्कूल येथे भंडारे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. के. आय. टी. कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी, तर आय.आय.टी. खरगपूर येथून एम.टेक् पूर्ण केले.
सन्मानप्राप्तीनंतर सुहास भंडारे म्हणाले, हा सन्मान आई-वडिलांच्या संस्कारांचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि पत्नी प्रीतीच्या समर्पित साथीचा, भाऊ प्रशांत आणि बहीण मंजुषा यांच्या पाठिंब्याचा आहे. कामाप्रति असलेली निष्ठा आणि देशासाठी काहीतरी देण्याची इच्छा यामागील बळ आहे. याक्षणी माझी आई सोबत नाही, याचे दुःख आहे. तिच्यासाठीच हा सन्मान आहे.