

जालिंदर हुलवान
मिरज : शहरात अनेक रस्ते हे खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे माती, धुरळा हवेत पसरला आहे. तसेच खराब वाहनांमुळे धुराचा त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना वाहने दुरुस्तीसाठी मेस्त्रीकडे सातत्याने घेऊन जावी लागतात, तर प्रदूषण व धुरळ्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जावे लागत आहे. याकडे महापालिका व प्रदूषण नियंत्रण विभाग प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
महापालिकेमध्ये सत्ता काँग्रेसची असो किंवा भाजपची असो, खराब रस्ते हे नागरिकांच्या नशिबातच आहे की काय? असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. शहरातील अनेक रस्ते दुरुस्त करण्यात आले.मात्र काही रस्त्यांचा अपवाद वगळता अनेक रस्ते हे खड्ड्यांनी भरलेले आहेत. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे माती हवेत मिसळून ती माती वाहनधारकांच्या डोळ्यात व पोटात जात आहे. यातून अनेकांना यामुळे श्वसनाचाही त्रास होत आहे. मिरजेत अपवाद वगळता एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. खड्डे पडल्याने आणि खोदकामामुळे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. आता पाऊस संपल्याने रस्ते उन्हामुळे सुकले आहेत. त्यामुळे वाहने जाताना धुरळा उडतो. आता यापुढे पुढचा पावसाळा येईपर्यंत आणखीन त्रास होणार आहे, हे स्पष्टच आहे.
गांधी चौकाकडून मिरज एमआयडीसीकडे जाणारा रस्ता आणि कॅन्सर रुग्णालयाकडून एमआयडीसीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात धुरळ्याचे साम्राज्य आहे. सांगली रस्त्याकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, वंटमुरे कॉर्नरकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता, पुढे शाहू महाराज चौकाकडे जाणारा रस्ता यांसह अनेक रस्त्यांवर धुरळ्याचे साम्राज्य आहे.