Agrani river : नदीला मारले... नदीही मारणारच

अग्रणीत अतिक्रमणांसह वाळू उपशाने गाठला कळस
Agrani river
नदीला मारले... नदीही मारणारच
Published on
Updated on

दिलीप जाधव

मळणगाव : नदीला आई म्हणायचे, तिचे पूजन करावयाचे आणि वर्तनातून मात्र तिचीच हत्या करावयाची. आपण माणसांच्या या वागण्याला ढोंग म्हणतात, कृतघ्नता म्हणतात. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतलेली आहे. कुर्‍हाड हा खरे तर खूपच सभ्य शब्द आणि साधे हत्यार झाले हो! आपण आपल्या नद्यांचा दररोज गळा घोटतो आहोत. राजकारणी, शासन, प्रशासन आदी यंत्रणा कोणतीही ’ओनरशीप’ घेत नाही. जीवदायिनी नद्या, जसं प्रदूषण वट्टात काय, तर पर्यावरण हा त्यांच्यापुढील प्राधान्याचा विषयच नाही. परिणामस्वरूप या प्रदूषणाची किंमत मोजावीच लागत आहे. जिल्ह्यातील झाडून सर्व नद्यांच्या सद्यस्थितीचा हा लेखाजोखा...

कधीकाळी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांच्या परिसराला समृद्ध करणारी, शेतीला पोषक ठरणारी आणि स्थानिक लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेली अग्रणी नदी अस्तित्वाच्या गंभीर संकटाला सामोरी जात आहे. अनियंत्रित अतिक्रमण, गावोगावीच्या सांडपाण्याचा मारा आणि बेसुमार वाळू उपसा यामुळे नदीचा पारंपरिक प्रवाह खंडित झाला आहे.

अग्रणी नदी नकाशावरच शिल्लक राहण्याची भीती आहे. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवाज उठवला असला तरी, गतीने अपेक्षित अंमलबजावणी नाही. महांकाली आणि कमंडलू या अग्रणी नदीच्या उपनद्या आहेत. लोणारवाडी हे महाराष्ट्रातील नदीकाठावरील शेवटचे गाव. ही नदी पुढे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते.तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नदीच्या काठावर असणार्‍या शेतकर्‍यांनी खास करून वज्रचौंडे, गव्हाण, मळणगाव, नदीपात्रात विहिरी खोदून त्या विहिरीला सिमेंट काँक्रिटचे कडे तयार केले आहे. त्या विहिरीतून निघालेले सर्व दगड, गाळ, माती नदीच्या पात्रातच टाकलेली आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाली. नदीपात्रात जवळपास दर 100 मीटरवर एक विहीर, असा भाग अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

तासगाव तालुक्यातील वायफळेपासून कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडीपर्यंत अग्रणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे अतिक्रमण आहे. नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळी नदीपात्रात पाणी नसते, त्यावेळेस शेतकरी बांध नदीपात्रात सरकवतात. थेटपणे नदीपात्रात पीक घेतले जाते. परिणामी नदीची पाणी वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. नदीच्या काठावर असणार्‍या सावळज, वज्रचौंडे, गव्हाण, मळणगाव, शिरढोण, हिंगणगावसह अनेक गावांतील स्मशानभूमी या नदीपात्रातच आहेत. सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपात्रामध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रिट, तर काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवलेत. काही गावांत नदीपात्रात मंदिरे आणि सार्वजनिक शौचालये आहेत. काँक्रिट बांधकामांमुळ नदीची रुंदी कमी होत असल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली. नदीपात्रालगतची गावे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांशी जोडली गेलेली नाहीत. परिणामी दररोज हजारो लिटर अस्वच्छ पाणी अग्रणी नदीत मिसळते. त्यामुळे ग्रामस्थांचे त्वचेचे आणि पोटाचे आजार वाढत आहेत. तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी, सावळज, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव आणि लोणारवाडी गावांच्या हद्दीतील नदीपात्रात वाळू व मातीचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे नदीकाठ ढासळत आहे. याचा भूजल पातळीवर मोठा परिणाम झाला आहे.

लोकचळवळीची गरज

अग्रणी धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले म्हणाले, शासन आणि सामाजिक संस्था दीर्घकालीन अशा उपाययोजना करू शकतात. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदी स्वच्छतेत नागरिकांचाही सहभाग असणे महत्त्वाचे आहे. कचरा व प्लास्टिक नदीत न टाकणे, पर्यावरणपूरक सण साजरे करणे, जलसंवर्धनासाठी जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. यापुढे नदीच्या संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची मोठी गरज आहे.

मी अग्रणी बोलतेय... कृष्णा नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी

उगम - सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या ऐनवाडी गावात.

एकूण लांबी - 105 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये 60 किलोमीटर कर्नाटकामध्ये 45 किलोमीटर.

महाराष्ट्रात अग्रणी नदीचे खोरे - खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांमध्ये. खोर्‍यातील गावे - 107

पाणलोट क्षेत्रे - सात

अग्रणी नदी स्वच्छतेसाठी शासन व स्थानिक प्रशासनाने काही योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, नदीकाठ सुशोभीकरण, पूर नियंत्रणासाठी बांधबांधणी यासारखे उपक्रम सुरू झालेले आहेत. मात्र त्यांचा वेग मंद असून अनेक प्रकल्प कागदावर मर्यादित राहिलेले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीचा वेग वाढला, तर गटारींचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद होईल,
सुरेखा जाधव लोकनियुक्त सरपंच, मळणगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news