

नागज : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे एका अज्ञात चोरट्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला असून चोरट्याने गावातील एक मोटरसायकल चोरून नेली आहे. सिमेंटच्या दुकानाचे कुलूप तोडले आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कपाटात ठेवलेले साहित्य विस्कटले आहे.
सोमवारी रात्री अज्ञात चोरट्याने आगळगाव येथे धुमाकूळ घातला. जिल्हा बँकेच्या शटर्सचे कुलूप कटावणीने तोडले. शटर्सच्या आतील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडता न आल्याने चोरट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर जवळच असलेल्या आगळेश्वर ट्रेडर्सचे सिमेंटच्या गोडावूनचे कुलूप तोडले. रघुनाथ पाटील यांची मोटरसायकल त्यांच्या घराजवळून जिल्हा बँकेच्या शाखेजवळ आणली. मोटरसायकलच्या केबल खोलून मोटरसायकल तेथेच सोडून चोरट्याने काढता पाय घेतला. चोरट्याने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कपाटात ठेवलेले साहित्य विस्कटले. गावातील जयसिंग रामदास पाटील यांची घराजवळ लावलेली मोटरसायकल (एम.एच. 10 ए. व्ही. 1200) चोरट्यांनी लंपास केली आहे.
घटनेची माहिती पोलिस पाटील रणजित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. गावातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांमार्फत घटनेचा अधिक तपास सुरू आहे.