

सांगली : रिपाइंच्या सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व अॅड. प्रकाश आंबेडकरांनी करावे, यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग करण्यास मी तयार आहे. समाजापेक्षा मंत्रीपद मोठे नाही, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
पहलगाम येथील हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. याबद्दल भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ रिपाइं आता देशभरात ‘भारत जिंदाबाद’ ही यात्रा काढणार आहे. ही यात्रा दि. 29 मेरोजी मुंबई येथील चैत्यभूमी येथून काढण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, आमच्यातील गटबाजीमुळे आमचा समाज सत्तेपासून दूर राहिला आहे. यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष असलेल्या आरपीआयच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे. आम्ही एकत्र आल्यास 25 ते 30 टक्क्यापर्यंत आम्हाला सत्तेत वाटा मिळू शकतो. महाराष्ट्रात दहा ते बाराजणांना मंत्रिपदे मिळू शकतात. अॅड. आंबेडकर यांच्याच घराण्यात तीन पक्ष निर्माण झाले आहेत. प्रथम त्यांनी एकत्रित यावे. अॅड. आंबेडकरांनी समाजहितासाठी एकत्र यावे.
आठवले म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीकडून रिपाइंला अधिक जागा मिळाव्यात, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी आमची मागणी आहे. यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अशोक गायकवाड, अण्णासाहेब वायदंडे, सुरेश बारशिंगे, विनोद निकाळजे उपस्थित होते.
पुणे येथील वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून तो खूनच आहे. 2 कोटी रुपये वैष्णवीच्या आई-वडिलांनी द्यावेत, या मागणीसाठी वैष्णवीचा सतत छळ केला जात होता. तिच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत तिच्या पाठीवर, अंगावर मारहाणीचे वळ उठले होते. त्यामुळे तिचा खून झाल्याची शक्यता आहे. मला दाखवलेल्या फोटोमध्ये मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. याप्रकरणी जे संशयित आहेत, त्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.