Sangli News| भल्या पहाटे... पुतळे हटवले... गाव संतापले...

दुधोंडी व आटपाडीत प्रशासनाची कारवाई; आंदोलनाचे इशारे
Sangli News
पलूस : दुधोंडी येथील पुतळा हटविल्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
Published on
Updated on

पलूस : दुधोंडी (ता. पलूस) गावात सहा महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने अनधिकृतरित्या बसवलेला पुतळा शुक्रवारी पहाटे पोलिस प्रशासनाने सन्मानपूर्वक हटवला. मात्र ही घटना कळताच ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली असून, निषेधाचे आंदोलन छेडण्यात आले. संपूर्ण गावाने एकत्र येत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला .

पोलिस प्रशासनाने हा पुतळा हटवू नये यासाठी दोन महिने महिला व युवकांनी रात्रभर गस्त घालून पुतळ्याची रक्षा केली होती. मात्र शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी पहाटे कडक बंदोबस्तात पुतळा काढला. ही बातमी सकाळी सहाच्या सुमारास गावात वार्‍यासारखी पसरली आणि ग्रामस्थांतून तीव्र नाराजी पसरली. तरुणांनी व नागरिकांनी गावातून मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. पोलिस प्रशासनाच्या या कृतीवर रोष व्यक्त करत गाव बंद ठेवण्यात आले. गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीत आपत्कालीन बैठक घेण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले. या बैठकीस माजी सरपंच विजय आरबुणे, उपसरपंच विजय जाधव, आरपीआयचे राजेश तिरमारे, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, पलूस बाजार समितीचे माजी संचालक जयवंतराव मगर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नागराज रानमाळे, तेजस मगर पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावकरी मात्र प्रशासनाच्या या कारवाईवर संतप्त असून, लवकरात लवकर शासनाने अधिकृत परवानगी घेऊन पुन्हा पुतळा बसवावा, अशी जोरदार मागणी करत आहेत.

आटपाडी शहरातही सांगोला रस्ता चौकात बसवलेला अर्धाकृती पुतळा सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय यंत्रणांनी गनिमीकाव्याने शुक्रवारी पहाटे मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटवला. या घटनेमुळे शहरात वातावरण तणावपूर्ण आहे. आटपाडी येथे सांगोला रस्ता चौकात हा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. 1 फेब्रुवारी रोजी बसवलेला हा पुतळा प्रशासनाने 2 फेब्रुवारी रोजी हटवला. त्याचदिवशी सायंकाळी कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा बसवला. 4 मार्च रोजी या पुतळ्याचे सुशोभीकरण देखील करण्यात आले होते.

काल पहाटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी विक्रम बांदल, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात हा पुतळा पुन्हा एकदा हटवला. सांगोला चौकात जागा अपुरी आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पुतळ्यासाठी बचत भवन परिसरात पर्यायी जागा देण्यात आली आहे. मिरवणूक काढून शासनाने दिलेल्या जागेत फलक देखील लावण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार जागा देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आणि पहाटे घरांना कड्या घालून जेसीबीने तोडफोड करत पुतळा हटवल्याचा आरोप केला आहे. सांगोला चौकात पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. घटनेच्या निषेधार्थ आटपाडी ते मुंबई लाँगमार्च काढणार असल्याचा इशारा दिला. निवेदनावर शैलेश ऐवळे, रणजित ऐवळे, सनी कदम, अजित रणदिवे, अविनाश रणदिवे आदींच्या सह्या आहेत.

सहा महिन्यांपूर्वी पुतळा अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे बसवला होता. शासनाची परवानगी नसल्यामुळे तो पुतळा सन्मानपूर्वक हटवण्यात आला. गावात शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जयसिंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, कुंडल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news