

सांगली : शरद जाधव
धूम्रपानाची सवय सुटावी म्हणून बाजारात आलेल्या ‘वेप’ अर्थातच ई-सिगारेटचेच तरुणांना व्यसन लागल्याचे चित्र आहे. आतापर्यंत मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित असलेली ही नशा सांगलीतही पोहोचली आहे. या नशेमुळे तरुणाई धुंदीत राहत असल्याने पालकांसमोरही याचे आव्हान आहे. धूम्रपानामुळे कॅन्सर, मधुमेह, किडनीचे आजार होऊ शकतात. त्यामुळेच सिगारेटच्या पाकिटावर त्याच्या गंभीर परिणामांची माहिती सचित्र दिलेली असते. तरीही याकडे दुर्लक्ष करून हवेत झुरके मारत या आजारांना निमंत्रणच दिले जाते. धूम्रपान, तंबाखू सेवनातून अर्थातच निकोटिनची लागलेली सवय सहजासहजी सुटत नाही. ते व्यसन सुटावे म्हणून अनेक उपाय केले जातात. सिगारेटचे व्यसन सुटावे यासाठी परदेशात ‘ई सिगारेट’चा पर्याय समोर आला होता.
‘लिक्विड निकोटिन’ स्वरूपातील हे एक डिव्हाईस असून, त्याला रिफीलचीही सोय आहे. तुलनेने त्याची किंमत महाग असली तरी, सध्या तरुणांमध्ये वेपच्या नशेचे फॅडच निर्माण झाले आहे. परदेशातून विशेषत: चायना मेड असलेले हे डिव्हाईस आता तरुणांना आकर्षित करीत आहे. शासनाच्या निर्णयानुसार शाळेच्या आवारापासून शंभरमीटरमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे, या आशयाचे फलक सर्वत्र लावलेले असतात. मात्र, ‘ई सिगारेट’ तंबाखूजन्यमध्ये मोडत नसल्याने अगदी शाळेजवळ या घातक नशेच्या सिगारेटचा वापर होत आहे. तरुणांबरोबरच शाळकरी मुलेही या जाळ्यात अडकली आहेत. पेनसारखे असणारे डिव्हाईस हाताळण्यासही सोपे असले तरी यामुळे तरुणाईचे आयुष्य बिघडवून टाकले जात आहे. ई सिगारेटच्या धोकादायक वापरामुळे शासनाने त्यावर बंदी घातली आहे. तरीही अगदी सहजपणे ही नशा उपलब्ध होत असल्याने चिंता वाढली आहे.
ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर होत नसला तरी, तंबाखूमधील महत्त्वाचा घटक निकोटिनचा वापर होतो. निकोटिनमुळे हृदय, फुप्फुसावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ई-सिगारेटमुळे हृदयावर सर्वाधिक आघात होतो. त्यामुळे पोटाचेही विकार जडू शकतात.
बाजारात उपलब्ध कागदी सिगारेटसारखी ही सिगारेट नसते, तर ते एक डिव्हाईस आहे. छोट्या बॅटरीवर ते चालते. यात द्रवस्वरूपात निकोटिन भरले जाते. बॅटरीमुळे ते वाफ तयार करते आणि ती ओढणार्याला नशा मिळते. विशेष म्हणजे विविध प्रकारचे ‘फ्लेवर’ही उपलब्ध आहेत. परदेशात या डिव्हाईसचा प्रामुख्याने उपयोग हा सिगारेटची सवय मोडण्यासाठी होते, आता ई-सिगारेटचे नवे व्यसन तरुणाईला जडले आहे.
सांगलीतील मानसोपचार तज्ज्ञ पवन गायकवाड म्हणतात... तरुणांना नेहमीच नावीन्याचा ध्यास असतो. प्रत्येक नवीन गोष्ट त्यांना आकृष्ट करत असतेच. अशीच ई-सिगारेटची नशा आहे. मुले ई -सिगारेट सुंघतात आणि सहकार्यांनाही त्याची सवय लावतात. ई-सिगारेटमुळे एकाग्रता होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलांचा एकटेपणा वाढतो. त्याच नशेत राहण्याची त्यांची मानसिकता राहते. त्यामुळे बंदी असतानाही हे ई - सिगारेट कसे उपलब्ध होतात, हा मोठा प्रश्न आहे. महाग परंतु सहजासहजी उपलब्ध होत आहे. पालकांनी याबाबत पाल्य काय करतो आणि त्याच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
शहरातील काही शाळकरी मुलेही या नशेत अडकल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्यावर्षी शहरातील एका शाळेतील स्वच्छतागृहात मुले याची नशा करताना आढळून आली होती. या मुलांनी घरातून पैसे चोरून त्यातून ई-सिगारेट खरेदी केले होते.
इतरांपेक्षाही वेगळी नशा मी करतो, हे दर्शविण्यासाठी ई-सिगारेटचा वापर होत असल्याचे मानसतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ई - सिगारेट ही घातक असल्याचे माहिती असूनही केवळ समोरच्याला प्रभावित करण्यासाठी अनेक तरुण यात अडकत आहेत.