

सांगली : माथाडी कायदा लागू न करणार्या कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कामगार आयुक्त यांना दिले . जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, हरिदास लेंगरे, प्रदीप शिंदे, राहुल दुधाळ, कामगार आयुक्त, पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते.
लेंगरे यांनी येथील सह्याद्री स्टार्च कारखान्यात माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नाही, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकार्यांनी बैठक घेतली. लेंगरे म्हणाले, माथाडी कायदा कामगारांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मात्र अनेक कारखाने, आस्थापना या ठिकाणी तो लागू केला जात नाही. कामगारांना मनमानी पद्धतीने काम करून घेऊन नोकरीवरून कमी केली जाते. कामगार मंडळाकडे न्याय मिळण्यासाठी त्यांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून आणखी लढा तीव्र करण्यात येईल.