

सांगली : विधान परिषदेच्या सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये सीमा सुनील पोतदार या अपक्ष उमेदवाराचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. एकूण ८ पैकी सात उमेदवारांचे ११ अर्ज वैध ठरले असून, किशोर हणमंत धुमाळ यांच्या अर्जावर रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती, अखेर त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने अभयसिंह खाशेराव जगताप व बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिले होते. पक्षाने जाहीर केलेले उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्याआधी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने अभयसिंह जगताप यांचा अर्ज अधिकृत ठरविण्यात आला. यामुळे आता बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांच्याऐवजी जगताप हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. पाटील यांची उमेदवारी अपक्ष ठरली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत ८ उमेदवारांचे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांच्या अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी छाननी केली. यामध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम (रा. गोरेगाव, जि. सातारा), महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह खाशेराव जगताप (रा. वरकुटे जि. सातारा) यांच्यासह प्रताप धोंडिराम पाटील (रा. उरूण-ईश्वरपूर), मयूर बाबासाहेब पाटील (रा. सांगली), संजय नायकू मेढे (रा. मिरज), तानाजी भगवान पाटील (रा. आटपाडी), किशोर हणमंत धुमाळ (रा. बागडवाडा, जि. सातारा) या सर्व अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
सीमा सुनील पोतदार, (रा. मार्डी, जि. सातारा) यांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्र व इतर कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरवण्यात आले. याबाबत सोमवारी सूचना करुनही त्यांनी आवश्यक कागदत्रे न जोडल्याने त्यांचे अर्ज अवैध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
राष्ट्रवादीने अभयसिंह जगताप व बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र जगताप यांना पाटील यांच्याअगोदर फॉर्म देण्यात आल्याने जगताप आता अधिकृत उमेदवार ठरले आहेत. किशोर धुमाळ या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर एका उमेदवारासह तीन मतदारांनी हरकत घेतली. अर्जावरील सह्या खऱ्या नसल्याची हरकत होती. याबाबत उशीरापर्यंत सुनावणी सुरु होती, अखेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. घोष यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला. आता अर्ज माघारीची शेवटची मुदत ४ जूनअखेर असून, त्या दिवशीच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.