

आटपाडीः दिघंची येथील श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांच्या मुदत संपलेल्या ठेवींची रक्कम परत न दिल्याचा गंभीर आरोप करत ठेवीदारांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी तात्काळ प्रशासक नेमून चौकशी करावी तसेच ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक आटपाडी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर तब्बल १५२ ठेवीदारांच्या सह्या असून, संस्थेत एकूण १७२ ठेवीदारांनी सुमारे ३.५ कोटी रुपयांच्या ठेवी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या सर्व ठेवींची मुदत संपून तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आजपर्यंत संस्थेकडून कोणालाही ठेव रक्कम परत मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पतसंस्थेकडे सुमारे ४१३ कर्जदार असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कोणत्याही प्रकारची प्रभावी कर्जवसुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता असून भविष्यात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
आयुष्यभर कष्ट करून मुलांच्या भविष्याकरिता जमा केलेल्या बचतीच्या ठेवी परत न मिळाल्यास अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतील, अशी भीतीही ठेवीदारांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यातही तक्रार देण्यात आली होती; मात्र हा विषय सहकार विभागाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगत ती तक्रार केवळ दप्तरी नोंदविण्यात आल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८० व ८३ नुसार संबंधित पतसंस्थेवर तात्काळ प्रशासक नेमून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अन्यथा ठेवीदारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे