

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील दोन वर्षांच्या काळात शेतकरी, व्यापारी वर्गासाठी केलेल्या विविध सेवा सुविधा आणि पारदर्शक कामाच्या जोरावर कोल्हापूर विभागात प्रथम तर राज्यात २२ वा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष पुणे पणन संचालणालय यांचे कार्यालयाकडून राज्यातील बाजार समित्यांची सन २०२३-२०२४ वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत कोल्हापूर विभागात आटपाडी बाजार समितीने प्रथम तर राज्यात २२वा क्रमांक पटकावला आहे.
याबाबत सभापती संतोष पुजारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. परिषदेस उपसभापती सुनील सरक,माजी उपसभापती राहुलगायकवाड, संचालक विठ्ठल गवळी, सुनील तळे,शरद काळेल, कुमार भिंगे,सचिव शशिकांत जाधव उपस्थित होते.
सभापती संतोष पुजारी म्हणाले, आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने शेतकरी हीत जोपासत अनेक मूलभूत सुविधा दिल्या. निस्वार्थ आणि पारदर्शक कामाच्या जोरावर आणि सर्व संचालक, सचिव शशिकांत जाधव यांच्या सहकार्याने हे यश मिळाले आहे. आता आम्ही राज्यात अव्वल ठरण्याचा प्रयत्न करू.
आटपाडी बाजार समिती 'अ'वर्गात आहे. बाजार आवारात शेळया-मेंढया बाजारात आणि डाळिंब सौदे बाजारात शेतकरी व्यापारी यांना पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळिंब शॉर्टींग पॉकिंग साठी दोन पॅक हाऊस सुरु केले आहेत. महिला व पुरुषासाठी नविन स्वच्छतागृह उभारले आहे.बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी स्वागत प्रास्ताविकात समितीच्या वाटचालीची माहिती दिली.