

आटपाडी : आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शनिवारी आठवडी शेळी-मेंढी बाजारात बकर्याला विक्रमी भाव मिळाला. मेथवडे येथील शंकर माळी यांच्या बकर्याला तब्बल 3 लाख 31 हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. हा बकरा पिलीव येथील रवींद्र घुले यांनी खरेदी केला.
बाजारात 4 ते 4.5 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली. अनेक शेतकर्यांना बकरे-बोकडांना चांगले दर मिळाले. बाजारात वाढती आवक आणि दरांमध्ये स्थिरता पाहता शेतकरी समाधानी असल्याचे चित्र होते. आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी आणि व्यापारी हजेरी लावतात.
बाजार समितीने आरओ पिण्याचे पाणी, लाईट, सीसीटीव्ही, शौचालय, स्वच्छतागृहे, स्वच्छता यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बाजार विकासाला चालना मिळाली आहे. बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, संचालक सुबराव पाटील, कैलास देवडकर, भीमराव पुजारी, नामदेव भिसे, शिवाजी काळे, मोहन कोरे, हरी पाटील, बाबू जरग, सुनील जरग, सुरेश शिंगटे, नाना पुजारी, आप्पा खरात आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेळ्या-बकर्यांना चांगला दर मिळत आहे. बाजार समितीने विविध सुविधा दिल्याने उलाढाल वाढली आहे. शेतकर्यांनी विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती संतोष पुजारी यांनी केले.