

आटपाडी : सप्टेंबर महिन्यात आटपाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असताना, गळवेवाडी (ता. आटपाडी) परिसरात या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
नुकसानीचे क्षेत्र विस्तृत असल्याने पंचनामे करताना प्रशासनास अडचणी येत आहेत. मात्र या परिस्थितीचा गैरफायदा काही व्यक्ती घेत असल्याचे उघड झाले आहे.
गळवेवाडी परिसरात काही व्यक्ती शेतकऱ्यांकडे जाऊन “तुमच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा व्यवस्थित करून भरपाई मिळवून देतो,” असे सांगत शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम घेत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे आर्थिक लूट होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुकसानीच्या पंचनाम्यातील गैरव्यवहारांबाबत तातडीने चौकशी करून, प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा, आधारकार्ड, फार्मर आयडी आदी कागदपत्रांची मागणी केली जाते. शेतकरी हे कागदपत्र तयार करून देण्यासाठी गावातील झेरॉक्स सेंटर किंवा महा ई-सेवा केंद्रात जातात. मात्र काही खाजगी व्यक्ती किंवा केंद्र चालक हे अर्ज भरण्याच्या नावाखाली प्रत्येकी सुमारे एक हजार रुपये आकारत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. कृषी सहाय्यकांकडे अनेक गावे असल्याने ते स्थानिक काही इसमांच्या मदतीने अर्ज भरून घेत आहेत. याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.