‘गणपती’, ‘म्हसोबा’लाही धाडली घरपट्टीची नोटीस

मंदिराला बनवले भोगवटादार; गाभार्‍यात ठेवली नोटीस : नागरिकांमध्ये संताप
Sangli News
म्हसोबा मंदिराला करमूल्यांकन (घरपट्टी) नोटीस बजावली आहे.
Published on
Updated on

सांगली : येथील खणभागातील रस्त्यावर असणार्‍या गणपती व म्हसोबा मंदिराला करमूल्यांकन (घरपट्टी) नोटीस बजावली आहे. मंदिराला भोगवटादार बनवून ही नोटीस दिली आहे. ती मंदिरातील गाभार्‍यात ठेवण्यात आली आहे. ही घरपट्टी आता कोण भरणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रातील मालत्तांचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण खासगी यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर मालमत्ताधारकांना, भोगवटाधारकांना करमूल्यांकन नोटिसा दिल्या आहेत. वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांमध्ये संताप असताना आता रस्त्यावरील मंदिरांनाही करमूल्यांकन नोटिसा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.

येथील खणभागात म्हसोबा गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरच झाडाखाली म्हसोबा मंदिर आहे. त्याला कोणी मालक नाही. परिसरातील लोक पूजा-अर्चा करतात. या मंदिराला आजपर्यंत घरपट्टी येत नव्हती. आता या मंदिराला 1 हजार 62 रुपये घरपट्टी आकारण्यात आली आहे. घरपट्टीत सामान्य कर माफ केला आहे. मात्र पाणीपुरवठा लाभकर 16 रुपये, जलनि:सारण कर 42 रुपये, साफसफाई लाभकर 21 रुपये, शिक्षणउपकर 10 रुपये, पथकर 5 रुपये, अग्निशमन कर 5 रुपये, वृक्ष कर 5 रुपये, महाराष्ट्र शासनाचा शिक्षण कर 46 रुपये, रोहयो उपकर 12 रुपये आणि उपयोगकर्ता शुल्क 900 रुपये असे एकूण 1 हजार 62 रुपये घरपट्टी आकारली आहे. या मंदिराशेजारील रस्त्यावर एका कोपर्‍यात गणपती मंदिर आहे. या मंदिरालाही 1 हजार 100 रुपयांची घरपट्टी आकारण्यात आली. मंदिरांना घरपट्टी आकारणीवरून संताप व्यक्त होत आहे.

हरकत कोण घेणार, सुनावणीला कोण जाणार..!

मंदिरांना बजावण्यात आलेल्या या घरपट्टीच्या नोटिसा मंदिराच्या गाभार्‍यात ठेवण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर मालमत्ताधारक म्हणून ‘धारक’, असा उल्लेख आहे. भोगवटादाराच्या नावासमोर म्हसोबा मंदिर, गणपती मंदिर असा उल्लेख आहे. त्यामुळे आता हरकत कोणी घ्यायची आणि सुनावणीला हजर कोणी रहायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंदिरांना कर लागणार नाही : अधीक्षक वाहिद मुल्ला

महापालिकेचे घरपट्टी अधीक्षक वाहिद मुल्ला म्हणाले, महापालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्वेक्षणात सर्वच बांधकामे, खुले प्लॉट रेकॉर्डवर आले आहेत. रस्त्यावर असणारी मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे. त्यांची केवळ महापालिकेच्या रेकार्डवर नोंद होणार आहे. त्यांना कर लागणार नाही. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news