

विटा : खानापूर तालुक्यात एका गावातील अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलीने विटा पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. गणेश रवींद्र वाघमारे (वय 22), सोमनाथ जालिंदर आवळे (वय 29, दोघेही रा. विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या चौघांवर विटा पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गणेश वाघमारे हा पीडित मुलीला ‘माझ्याशी लग्न कर’, असे म्हणून सतत मागे लागला होता. त्यानंतर वाघमारे याने मुलीला ‘तू माझ्यासोबत लग्न केले नाही, तर तुझ्या घरातील सर्वांना मारून टाकेन’, अशी धमकी देत गेले वर्षभर बलात्कार केला. वाघमारे याच्या धमकीला घाबरून तिने कुणाला हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर 20 जूनरोजी दुपारी पीडित मुलगी आणि तिची बहीण हे शेताकडे निघाल्या होत्या. त्यावेळी गणेशचा मित्र, संशयित सोमनाथ हा दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागून आला. त्याने गाडी थांबवून ‘तुम्हाला शेतात सोडतो,’ असे म्हणून अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीला गाडीवर बसवले. एका माळावर घेऊन गेला. त्याने त्याचे मित्र संशयित शरद आणि दिलीप यांना फोन करून बोलावून घेतले. तेथे सोमनाथने ‘मी तुझ्याशी लग्र करेन’, असे म्हणून तिच्यावर बलात्कार केला. संशयित शरद आणि दिलीप यांनीही तिचा विनयभंग करून पलायन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे यांना अटक करण्यात आली आहे, तर शरद व दिलीप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन तपास करीत आहेत.