सांगली : विट्यात मोबाईलवरून त्रास देणाऱ्या तरुणास एक वर्षाची सक्तमजूरी

सांगली : विट्यात मोबाईलवरून त्रास देणाऱ्या तरुणास एक वर्षाची सक्तमजूरी

विटा : पुढारी वृत्तसेवा: एका तरुणीच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन करून त्रास आणि धमक्या देणाऱ्यास विटा न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. गणेश अरुण पवार (वय २०, रा. पवारवा डी, ता.खटाव,जि.सातारा) असे त्याचे नाव आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असलेल्या केसेस तातडीने निकाली काढण्यात याव्यात अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलीस ठाण्यातील १६ ऑगस्ट ते १३ ऑक्टोबर २०१७ या काळात आरोपी गणेश पवारने एका तरुणीच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन करुन मैत्री आणि प्रेमासंबंधी मेसेज पाठविले. तसेच लग्नापूर्वीचे फोटो तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर टाकून लग्न मोडण्याची धमकी दिली. शरीरसंबंधाची मागणी केली आणि तिच्या होणाऱ्या नव-यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत संबंधित तरुणीच्या तक्रारीनुसार, विटा पोलीस ठाणे भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ (अ) (ड), ५०७, ५०९ प्रमाणे १६ ऑक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनी पूर्ण करुन आरोपी गणेश पवारच्या विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन विट्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर खटला चालवला. यात या गुन्ह्यातील आरोपी गणेश पवार यास १ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरलेस अधिकची १ महिना सक्तमजुरी सुनावली आहे.

न्यायालयात सुनावणी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. वाघमोडे, पोलिस रविंद्र महाडीक यांनी पैरवी अंमलदार म्हणून तर सरकारी वकील म्हणून पी. एस. कोकाटे यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news