![Teacher's Appointment on vacant post](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F24c22301-298b-42ac-894d-ffe72a6ca7dd%2FWhatsApp_Image_2022_07_29_at_12_09_57_PM.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली : पवित्र पोर्टलमधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे नव्याने 95 शिक्षण सेवक दाखल झाले आहेत. या उमेदवारांच्या कागदपत्रांची मंगळवार, दि. 3 जुलै रोजी तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत, प्रशासनाच्यावतीने त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात पवित्र पोर्टलमधून आलेल्या 248 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. आता नव्याने शिक्षण सेवक दाखल झाले आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमांमध्ये 74 विज्ञान, गणित पदवीधर, 6 सेमी इंग्रजी असे एकूण 80 शिक्षण सेवकांचा समावेश आहे.
तसेच कन्नडमध्ये 8 उपशिक्षक, 6 विज्ञान, गणित पदवीधर असे एकूण 14 आणि उर्दूचे 1 उपशिक्षक असे एकूण 95 शिक्षण सेवक दाखल झाले आहेत. या उमेदवारांची मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दि. 3 जुलै रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये वसंतदादा पाटील सभागृहात कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यानंतर त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.
नव्याने दाखल झालेल्या शिक्षण सेवकांमुळे काही शाळेत रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात ज्या शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त असतील तिथे सेवानिवृत्त शिक्षक मानधन तत्त्वावर लवकरच भरण्यात येणार आहेत. शासनाकडे यासाठी मान्यता मागवण्यात आली आहे. मान्यता मिळाल्यानंतर लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.